मुस्लीम समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा मुस्लीम मोर्चाच्या वतीने रविवारी गोळीबार मैदान ते विधानभवन असा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

गोळीबार मैदानापासून मोर्चाला सकाळी सुरुवात झाली सोनवणे रुग्णालय, रामोशी गेट, केईएम रुग्णालय, नरपतगिरी चौक, जुनी जिल्हा परिषद, साधू वासवानी चौकातून मोर्चा विधानभवनाकडे मार्गस्थ झाला. समाजाला देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण कायम करावे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, देशभरात जमावाच्या हल्ल्यात आतापर्यंत ७८ पेक्षा अधिक निरपराध मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्य़ात दोषी असलेल्यांना फाशीची शिक्षा द्यावी, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये, वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करावीत, मुस्लीम समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, अशा विविध मागण्या मुस्लीम मूक महामोर्चा समन्वय समितीकडून या वेळी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती समितीचे हाजी नदाफ, रशीद शेख यांनी दिली.