खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटल्याने जलप्रलय आलेल्या दांडेकर पूल परिसराची शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज अधिकारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. नेमकी कशामुळे ही घटना घडली याची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुठा उजवा कालवा फुटल्याने गुरुवारी सकाळी दांडेकर पूल परिसरात शेकडो घरांची पडझड झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण कालव्यातील पाणी प्रचंड वेगाने दांडेकर पूल परिसर, जनता वसाहत आणि दत्तवाडी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये तसेच घरांमध्ये शिरल्यामुळे शेकडो संसार क्षणार्धात रस्त्यावर आले होते. तब्बल ७५० घरांना या जलप्रलयाचा फटका बसल्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी गिरीश महाजन यांनी जलप्रलयाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. कालवा दुरुस्तीचे काम तीन दिवसात होईल. या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली असून यातील बाधितांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी पोखरल्याने कालवा फुटल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत, अशी माहिती महाजन यांनी दिली.

दरम्यान, कालवा फुटण्यासाठी गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशींचे कारण दिले असले तरी अतिक्रमणामुळेही कालवा फुटल्याची चर्चा आहे. कालव्या काठच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. ती काढून टाकण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली होती. त्यानंतर ही जमीन भुसभुशीत झाली. त्यामुळे कालव्याची भिंत खचली व कालवा फुटला असा दावा गुरुवारी करण्यात आला होता. तसेच कालव्या काठच्या बाजूला महावितरणसह अन्य काही खासगी कंपन्यांनी केबल टाकण्याचे काम केले होते. या कंपन्यांनी केबल टाकताना चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे भिंत खचल्याची चर्चादेखील सुरु आहे.