आपल्या संस्कृतीमध्ये नदीला माता म्हटले आहे. मात्र, नदीचे प्रदूषण करण्यासाठी आपण नागरिकच कारणीभूत ठरतो. नदी स्वच्छ आणि प्रवाही राहण्यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतला पाहिजे. मुठा नदीशी शहराचे तुटलेले नाते परत जोडण्याच्या कामाची सुरूवात करण्याच्या उद्देशातून ‘जीवित नदी’ या स्वयंसेवकांच्या गटातर्फे २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुठाई नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुळा-मुठा नद्यांना परत एकदा जीवित करायचे या ध्येयाने काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘जीवित नदी’ हा उपक्रम सुरू केला. याचे बहुतांश सदस्य हे प्रकाश गोळे यांच्या ‘इकॉलॉजी सोसायटी’चे विद्यार्थी आहेत. नदीविषयक काम करणाऱ्या सर्व संस्था आणि व्यक्तींना एकत्र आणण्याचा ‘जीवित नदी’ गटाचा उद्देश आहे. त्याच भूमिकेतून मुठाई नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शैलजा देशपांडे यांनी सोमवारी दिली.
जागतिक नदी दिनाच्या संकल्पनेवरून २ ऑक्टोबर रोजी डेक्कन बसस्थानकामागे नदीकाठी सकाळी ७ ते १० या वेळात श्रमदानातून नदीकाठ स्वच्छ करण्यातून या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने किमान १५ मिनिटे स्वच्छतेच्या कामासाठी द्यावीत ही अपेक्षा आहे. सिद्धेश्वर मंदिर घाट येथे ३ ऑक्टोबरला प्रसिद्ध चित्रकार मििलद मुळीक यांच्यासमवेत नदीचे चित्र काढण्याची संधी मिळणार आहे. ‘क्लिक द रिव्हर’अंतर्गत मुठा नदीच्या उगमापासून ते भीमा नदीशी होणाऱ्या संगमापर्यंत तुमच्या आवडत्या ठिकाणी छायाचित्र टिपून आम्हाला पाठवा, अशी हौेशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. हेरिटेज वॉकच्या धर्तीवर नदी केंद्रस्थानी ठेवून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पदयात्रा आयोजित केली आहे. त्याचदिवशी कबीर बाग सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता नदीविषयक सांस्कृितक कार्यक्रम होणार आहे. घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे ६ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या ‘एका नदीची गोष्ट’ या छायाचित्र प्रदर्शनाने मुठाई नदी महोत्सवाची सांगता होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2015 3:15 am