चिकन स्वस्त, मासळीचे दर स्थिर

पुणे : आषाढ महिन्यात सामिष खवय्यांची चंगळ असते. आषाढ महिन्यानंतर पुढील चार महिने सामिष पदार्थाचे सेवन अनेकजण निषिद्ध मानत असल्यामुळे आषाढ महिन्यात मटण, चिकन, मासळीला खवय्यांकडून मोठी मागणी असते. मागणीत वाढ झाल्यामुळे मटणाच्या दरात प्रतिकिलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे. चिकनलाही मागणी चांगली आहे. चिकनचे दर प्रतिकिलोमागे दहा रुपयांनी उतरले आहेत.

आषाढ महिन्यात मटण, चिकन, मासळीच्या दरात मोठी वाढ होते. आठवडय़ातील  रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी मागणीत अधिक वाढ होते. हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडूनही चांगली मागणी असते. यंदा पाऊस सुरू असल्याने मेंढी आणि बक ऱ्यांचा पुरवठा कमी झाला असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मटणाच्या दरात प्रतिकिलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो मटणाचा दर ४८० रुपये किलो असा आहे, अशी माहिती मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

शीतल अ‍ॅग्रोचे रूपेश परदेशी म्हणाले, आषाढ महिन्यात चिकनच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि कंपन्यांकडून चिकन पुरवठा वाढविण्यात आला आहे. चिकनच्या मागणीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिकनचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याने दर दहा रुपयांनी उतरले आहेत. गेल्या आठवडय़ात चिकनचा प्रतिकिलो दर १४० रुपये होता. सध्या चिकनची विक्री १३० रुपये प्रतिकिलो दराने केली जात आहे. मागणी आणि पुरवठा व्यवस्थित होत असल्याने मासळीचे दर स्थिर असल्याची माहिती गणेश पेठ  मासळी बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.  मटण, मासळी तसेच चिकनला रविवारी खवय्यांकडून मोठी मागणी असते. शहरातील कसबा पेठ, लष्कर  तसेच गणेश पेठेतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे.

अंडी महागली

पावसाळा सुरू झाल्याने अंडय़ांच्या मागणीत वाढ झाली आहे. इंग्लिश अंडय़ांच्या दरात शेकडय़ामागे पंचवीस ते तीस रुपयांनी वाढ झाली आहे. देशी अंडय़ांच्या दरात शेकडय़ा मागे तीस ते चाळीस रुपयांनी वाढ झाली असल्याचे चिकन आणि अंडी विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले.