सोसायटय़ा, झोपडपट्टय़ांमध्ये वेगळे अनुभव

पिंपरी: करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासह मृत्युदर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यशासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या व्यापक स्वरूपाच्या मोहिमेला पिंपरी-चिंचवड शहरात फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र पहिल्या टप्प्यात आहे. शहरातील सोसायटय़ा आणि झोपडपट्टीत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

शहरात १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक नागरिकाची प्रत्यक्ष भेटून आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्यानुसार शहरातील २५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ लाखाहून अधिक कुटुंबांना भेटी देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यासाठी स्वयंसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १५०० हून अधिक पथके नियुक्त केली आहेत.

गेल्या दोन आठवडय़ात मोहिमेतील सदस्यांना सोसायटय़ांमध्ये प्रवेश मिळताना बऱ्याच अडचणी जाणवतात. अनेकदा झोपडपट्टय़ांमध्ये नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे अनुभव आले आहेत. घरी आलेल्या पथकाला कुटुंबातील सदस्यांच्या आजारांची माहिती दिली जात नाही. चाचण्या करून घेण्यास नागरिक उत्सुक नसल्याचे दिसते. रोजंदारी काम करणारे घरी नसतात. विद्यार्थी, परप्रांतीय, मजूर, बाहेरगावावरून आलेले नागरिक आपआपल्या घरी गेल्याने बहुतांश घरे बंदच असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले.

विविध माध्यमांचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवकांनी पुढाकार घेतला असल्याने नागरिकांचे सहकार्य मिळू लागले आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुरुवार, शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या दिवशी व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

– अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, पिंपरी पालिका

विभागीय केंद्र           घरांची संख्या           पथकांची संख्या

भोसरी                    १ लाख ९४ हजार             ३७१

सांगवी                        ८६ हजार ८७२             १६५

थेरगाव                    १ लाख ११ हजार             २१२

यमुनानगर                 ८६ हजार ८०४              १६५

आकुर्डी                       ८६ हजार ०४२              १६४

जिजामाता                  ९८ हजार ९७१              १८९

चव्हाण रुग्णालय         ४३ हजार १५७              ८७

तालेरा रुग्णालय         १ लाख १२ हजार           २१४

पिंपरी पालिकेचे कर्मचारी आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी सोसायटय़ांमधील सदनिकाधारकांपर्यंत येतील. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सोसाटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी पालिका