सुप्रियाने मला सांगितलंय त्यांना पक्षात घेऊ नको, मात्र शिवाजीनगरबाबत मी शांत डोक्याने विचार करेन अशा शब्दांत अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भुमिका मांडली. त्यांचे हे विधान विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्याबाबत सहानुभूती दाखवणारे होते. तर, लक्ष्मण जगताप यांना पक्षाचे दरवाजे कायमचे बंद केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोसरी तसेच शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. त्यांना तुम्ही पक्षात घेणार का? या प्रश्नावर ते बोलत होते.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सडक्या आंब्या सारखे आहेत, असे संबोधले होते. या त्यांच्या विधानाचा अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, सडका-नासका काय म्हणता मोदी लाट होती म्हणून आमचे आमदार तुमच्याकडे आले आणि त्यामुळे तुम्ही सत्तेत आहात, त्याचा विचार करून विधान करा. हेच आमदार तुमच्या पक्षातून बाहेर पडले तर तुमचे सरकार पडेल. घोडा मैदान लांब नाही लवकरच तुम्हाला ते कळेल अशा शब्दांत त्यांनी यावेळी बापटांना सुनावले.