एन. राम यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

पुणे : भारत हे हिंदू राष्ट्र असून हिंदूुत्व हीच देशाची ओळख असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय नागरिकत्वाच्या आणि राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता मूल्यावर घाला घालत आहे. भारतीय संस्कृतीला आणि सर्व भारतीयांना हिंदू करून हिंदुत्वाला वैधता बहाल केली जात आहे, अशा शब्दांत ‘द हिंदू’चे संचालक एन. राम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर मंगळवारी टीका केली. हुकूमशाहीला बळ देणारे राष्ट्रीय ऐक्य आणि देशभक्तीचा वापर करून खोटय़ा राष्ट्रवादाला आणि जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेतर्फे ‘वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने (जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव, धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने) या विषयावर एन. राम यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्यान पुष्प गुंफले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार, डॉ. शैला दाभोलकर, समितीचे सचिव मिलिंद देशमुख आणि जिल्हाध्यक्षा नंदिनी जाधव या वेळी उपस्थित होत्या.

राम म्हणाले, हिंदुतत्त्ववादी संघटना आणि त्यांच्याच काही अतिरेकी समविचारी संघटनेच्या पाठिंब्यामुळे भाजपला बहुमत मिळाले. सोयीच्या धर्मनिरपेक्षता रणनीतीचा वापर करून राजकीय संघटन करण्यासाठी फसव्या राष्ट्रवादाचा बुरखा पांघरून अशा संघटनांना लोकमान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपल्यातील उपजत वैज्ञानिक जाणिवा आणि विवेकवादाच्या अंगीकाराशिवाय जातीयवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद, धर्माधता आणि अतिरेकाच्या विरोधातील लढा यशस्वी होणार नाही. भारतात प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच दडपणाखाली आहे. त्यातून सामान्य नागरिकही सुटलेले नाहीत. जम्मू आणि काश्मीरमधील सर्व जनतेला त्यांचे इंटरनेट बंद ठेवून माहितीपासून दूर ठेवले गेले. इतके मोठे पाऊल उचलण्याबाबत सरकारला कोणतेही स्पष्टीकरण देणे गरजेचे वाटले नाही.

गोखले म्हणाले, सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अडवले जाते ही गोष्ट देशासाठी नक्कीच भूषणावह नाही. पहलू खान प्रकरणात मारेकरी सुटले. त्याची पुनरावृत्ती डॉ. दाभोलकर प्रकरणामध्ये होऊ नये याची दक्षता शासकीय आणि न्याययंत्रणेने घेतली पाहिजे.