19 October 2019

News Flash

कोणीही जातीने माजू नये अन् लाजूही नये- नागराज मंजुळे 

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोणीही जातीने माजू नये अन् लाजूही नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. रामदास आठवले, सीमा आठवले आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज सुधारणेची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अजूनही जातीची कवाडं करकचून बांधून ठेवली गेली आहेत. राखणदारही ठेवले आहेत. विश्व इतके मोठे आहे तर मी दलित असण्याची खंत का बाळगावी, असा प्रश्न उपस्थित करीत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोणीही जातीने माजू नये अन् लाजूही नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंजुळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सीमा आठवले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. विलास आढाव, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनील कांबळे, सुनीता वाडेकर, राजेंद्र शिळीमकर, अनुसया चव्हाण, अश्विनी लांडगे, राणी चव्हाण या वेळी उपस्थित होत्या.

चित्रपटाने प्रश्न उपस्थित करून जागृती होते, पण चित्रपटाने समाज सुधारतो का ही अजूनही शंका आहे, असे सांगून मंजुळे म्हणाले, युरोपमध्ये मतदानासाठी महिलांना संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांनी घटनेमध्ये महिलांना हा अधिकार दिला या गोष्टीची जाणीव आहे का, दलित, वंचित असणं एवढेच असेल तर, सर्व महिला बाबासाहेबांच्या अनुयायी असायला हव्यात.  चित्रपट पाहतानाचे स्वप्न आणि समाजातील वास्तव यांचा संघर्ष हळूहळू तुटला. मी जे जगतो तेच मांडणे ही माझी अभिव्यक्ती मला चित्रपट माध्यमात गवसली.

नागराजने साऱ्या देशात सैराट गाजविला अन् मी माझ्या भीमाच्या नावाचा डफ वाजविला, अशी काव्यमय सुरुवात करीत आठवले यांनी नर्मविनोदी शैलीत संवाद साधला. दलित पँथर चळवळीतील छावण्यांच्या स्थापनेसाठी गावोगावी फिरलो असल्याच्या आठवणींना उजाळा देत नागराज मंजुळे यांनी समाजाचे सत्य चित्रण चित्रपटातून मांडले असल्याचे सांगितले. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहे असे महात्मा बसवेश्वर आणि बाबासाहेबांनी सांगितले होते. मंजुळे यांनी आता पँथर चळवळीवर चित्रपट निर्माण करावा, असेही ते म्हणाले.

मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले.

भाजपसमवेत राजकीय युती

मुंबईच्या उद्यानातील पँथर माझ्या मुलाने तर टायगर आदित्य ठाकरे यांनी दत्तक घेतला आहे. हे दोन िहस्र पशू राजकारणात मात्र एकत्र आहेत. भाजप-शिवसेना आणि आरपीआय एकत्र आले आहेत. आता शिवसेना राहते की नाही हे ठाऊक नाही, अशी टिप्पणी रामदास आठवले यांनी केली. भाजपबरोबर वैचारिक मतभेद असले तरी आमची युती राजकीय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on June 12, 2017 3:36 am

Web Title: nagraj manjule get bharat ratna dr babasaheb ambedkar award