‘प्रत्येक नक्षत्राचे एक झाड’ या संकल्पनेतून सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधीच्या जवळ नक्षत्रवन उभे राहते आहे. आंबा, जांभूळ, चिंच, बेहडा, अर्जुन, खैर अशी विविध झाडे या वनात लावली जात आहेत.
‘व्रित्ती फाउंडेशन’ या संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला असून नुकतीच या ठिकाणी संस्थेने नक्षत्रवन संकल्पनेची १५० झाडे लावली. आप्त, अंजन, बेल, शमी, वड, पळस, नागकेशर, कळंब, नागचाफा ही झाडेही सिंहगडावरील या वनात लावली जात आहेत. या वनात एकूण ४५० झाडे लावली जाणार असून पुढच्या महिनाभरात प्रत्येक प्रजातीची ५ ते ७ झाडे लावली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी बेद्रे यांनी दिली. ते म्हणाले, ‘सध्या सिंहगडावर अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे नवीन लावलेल्या रोपांना आत्ता वेगळे पाणी द्यावे लागणार नाही. पाऊस संपल्यानंतर मात्र या झाडांसाठी पाण्याची टाकी आणि ठिबक सिंचनाची सोय करण्याचा आमचा मानस आहे.’
या वृक्षारोपणासाठी ‘देवराई’ या रोपवाटिकेमार्फत रघुनाथराव ढोले यांनी रोपे मोफत उपलब्ध करून दिली होती. तसेच घेरा सिंहगड येथील वन परिमंडळ अधिकारी प्रभाकर कड आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचीही वृक्षारोपणासाठी मदत घेतल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
नक्षत्रवनाच्या संकल्पनेत कृत्रिका नक्षत्रासाठी उंबर, भरणीसाठी आवळा, पुनर्वसूसाठी वेळू, पुष्य नक्षत्रासाठी पिंपळ, धनिष्ठेसाठी शमी, पूर्वा-भाद्रपदासाठी आंबा, उत्तरा-भाद्रपदासाठी कडुनिंब अशा प्रकारे विविध नक्षत्रांची विविध झाडे मानली जातात.