पुणे महापालिकेतर्फे या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक, कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना प्रदान करण्यात येणार असून मानपत्र, एक लाख अकरा हजार रुपये, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महापौर वैशाली बनकर यांनी शुक्रवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. सभागृहनेता सुभाष जगताप आणि आरपीआयचे महापालिकेतील गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे हेही या वेळी उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीत लक्षणीय योगदान राहिलेल्या कार्यकर्त्यांचा बहुमान करण्यासाठी हा पुरस्कार या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. महापालिकेचा हा पहिला पुरस्कार ढसाळ यांना प्रदान केला जाईल. त्यासाठीच्या निवड समितीमध्ये रामनाथ चव्हाण, रावसाहेब कसबे तसेच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
पुरस्कार प्रदान समारंभ सोमवारी (१८ मार्च) दुपारी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि निखिल वागळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल.