News Flash

विकासाचे नाव, सुविधांचा अभाव

विकासाचे नाव आणि सुविधांचा अभाव अशी या प्रभागाची अवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे.

 

|| चिन्मय पाटणकर

पुणे : मुंबई-बेंगळुरु महामार्गाला शहराशी जोडणारा, झपाट्याने विस्तारणारा भाग म्हणजे बावधन-कोथरूड या प्रभाग क्रमांक दहामध्ये वनाजपासून कोथरूड डेपो, भुसारी कॉलनी ते बावधन असा मोठा भाग येतो. मैलापाणी वाहिनीचा प्रश्न, ओढ्यांची साफसफाई, स्वच्छतागृहांचा अभाव, पदपथांवर झालेले अतिक्रमण अशा मूलभूत समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. त्यामुळे विकासाचे नाव आणि सुविधांचा अभाव अशी या प्रभागाची अवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे.

हिंजवडीच्या आयटी पार्कला जाण्यासाठी सोयीचे ठरत असल्याने कोथरूड, बावधन परिसर हा ‘बहुभाषिक’ म्हणून ओळखला जातो. झोपडपट्टी, वस्ती, गावठाण, सोसायट्या, अपार्टमेंट असे सर्व स्तरातील नागरिक या प्रभागात राहतात.  या प्रभागातील चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमदार चंद्रकांत पाटील याच प्रभागातील रहिवासी आहेत.

शहरातील मेट्रोची पहिली मार्गिका याच प्रभागातून सुरू होते. येत्या काळात या भागातील नागरिकांना वाहतुकीचा वेगवान आणि चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. मात्र सद्यङ्मस्थितीत या भागात वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे. सकाळी आणि सायंकाळी या भागात प्रचंड वाहतूककोंडी होत असते. पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. नागरिकांना सरळ पन्नास मीटर चालता येणार नाही अशी पदपथांची अवस्था झाल्याचे चित्र आहे. आशिष गार्डन परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्याचे काम रखडले आहे. प्रभागात कचऱ्यामुळे अस्वच्छता झाली आहे. चांदणी चौकाच्या उड्डाण पुलाचे कामही अनेक वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरून शहराकडे येणारी वाहने वेगात असल्याने काही वेळा अपघाताच्या घटनाही झाल्या आहेत. तसेच वाहतूककोंडी, पार्किंगचीही समस्या तर नित्याचीच आहे. प्रभागातही सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे.

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

विद्यमान नगरसेवक महापालिकेच्या निधीची उधळपट्टी करत आहेत. पूर्वी केलेलीच कामे नव्याने केली जात आहेत. तसेच श्रेय लाटण्याचे प्रकार होत आहेत. ओढ्याची सफाई नाही, रामनदीचे गटार झाले आहे, मैलापाणी वाहिनी, पाणी हे प्रश्न तसेच आहेत. अनेक कामांची बिले निघाली, पण प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. हाती पूर्ण सत्ता असताना प्रभागात चांगले प्रकल्प होण्याची गरज होती. नवीन दवाखाना, प्रसूतिगृह असे नागरिकांसाठी चांगले काहीच झाले नाही. कोणतेही ध्येय, नियोजन नसलेल्या या नगरसेवकांची पोलखोल करणार आहे.  – किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महात्मा सोसायटीतील रस्त्याच्या वादात विद्यमान नगरसेवकांनी काहीच के ले नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बावधनमधील दोन्ही क्रीडा संकु लांची कामे प्रलंबितच आहेत. तसेच पाण्याचा भयानक प्रश्न आहे. साफसफाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूक कोंडी, अतिक्रमणांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. विद्यमान चारही नगरसेवक हवेवर निवडून आलेले आहेत. या चार नगरसेवकांनी आधी सुरू झालेली कामे सोडून प्रभागात काय नवे के ले, कोणते प्रकल्प आणले हे दाखवावे. त्यांना चार वर्षांत काहीही करता आलेले नाही. – शंकर के मसे, राष्ट्रवादी काँग्रेस’

नागरिक म्हणतात

डीपी रस्त्याचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पार्किंगची समस्या आहे. अस्वच्छतेमुळे डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. काही सोसायट्यांना पाण्याचीही समस्या आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी हेच मुद्दे येतात, आश्वासने मिळतात आणि पुढे काही होत नाही. आमच्या प्रभागातील नगरसेवकांपर्यंत पोहोचता येते, संवाद होतो, त्यांच्या परीने काही कामे करतात. पण महत्त्वाची असलेली आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे अजूनही होताना दिसत नाही. महापौर, पालिका प्रशासनाकडे जाऊनही कामे प्रलंबितच आहेत.  – योगेश ढगे, कुंबरे पार्क

बऱ्याच वर्षांपासून भुसारी कॉलनीतील अ‍ॅमिनिटी स्पेसच्या वापराचा प्रश्न पाठपुरावा करूनही सुटलेला नाही. त्यासाठी नागरिकांना न्यायालयीन लढाही देऊनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान, सुविधा नसल्याने मुलांचा विकास खुंटतो आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे ही मोठी समस्या आहे. चांदणी चौक उड्डाण पूल अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. नगरसेवकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो, काही वेळा ते सहकार्य करतात. प्रशासकीय यंत्रणेकडून नागरिकांना काहीच सहकार्य के ले जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे काय हा प्रश्न आहे. – राजेश मनगिरे, भुसारी कॉलनी

लोकप्रतिनिधी म्हणतात

बावधन येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. तसेच बावधन येथेच स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, मेडिटेशन हॉल आणि बॅडमिंटन कोर्टचे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल. मोरे विहार परिसरातील नागरिक गेली पंचवीस वर्षे रस्त्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करून रस्ता केला. पुणे-बेंगळुरु महामार्ग ते महात्मा सोसायटीच्या रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लावले.

– किरण दगडे पाटील, नगरसेवक

महात्मा सोसायटीत लहान मुलांसाठी उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. शास्त्रीनगर परिसरात बहुद्देशीय सभागृह बांधण्यात आले असून कुंबरे टाउनजवळ महापालिकेच्या अ‍ॅमेनिटी स्पेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विरंगुळा केंद्राचे काम सुरू आहे. लोहिया जैन आयटी पार्कजवळ वाहतूक नियंत्रक दिव्यांसाठी पाठपुरावा करून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत.

      – डॉ. श्रद्धा प्रभुणे, नगरसेविका

उजव्या भुसारी कॉलनीमधील सर्वेक्षण क्रमांक ९८ मधील दोन मोकळ्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. या दोन जागांवर मैदान आणि उद्यान विकसित करण्यात येत आहे. एकलव्य महाविद्यालयाजवळील भुजबळ टाउनशिप येथील मोकळी जागा ताब्यात घेण्यात आली आहे. तेथे जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याचे नियोजित आहे. पडून होत्या. मोकाटेनगर, कोथरूड येथे सांस्कृतिक हॉल आणि व्यायामशाळेचे काम पूर्णत्वास आले आहे. शास्त्रीनगर, इंदिरा शंकर नगरी, सागर कॉलनी, मोकाटेनगर, गादीय इस्टेट, श्रीकृष्ण कॉलनी, साईनाथ वसाहत येथे सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आले आहेत.

– अल्पना वर्पे, नगरसेविका

प्रभागातील सर्व भागांमध्ये विकास कामे के ली आहेत. साडेसात कोटी खर्च करून शाळेचे काम सुरू आहे. स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे. सहा ठिकाणी उद्यानांचे काम अंतिम टप्प्यात आहे. वनविभागाच्या साडेबारा एकर जागेत नागरी वनउद्यान उभारण्यात येत आहे. बालभवनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. नोकरदारांच्या मुलांचा सांभाळ आणि शिक्षण त्या ठिकाणी होईल. तीन मजली व्यायामशाळाही उभारली जात आहे. चांदणी चौकाच्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी २६५ कोटींची तरतूद मिळविण्यासाठी पाठपुरावा के ला. चार ते पाच रस्त्यांची कामे मार्गी आहेत.

– दिलीप वेडे पाटील, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

  •  मैलापाणी वाहिन्या, पावसाळी वाहिन्या, पथदिव्यांची कामे मार्गी
  •  उद्यान, क्रीडा संकु लांचे काम सुरू आणि प्रस्तावित
  •  डीपी रस्ता, मोरे विहार रस्त्याचे काम काम मार्गी

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

कोथरूड डेपो, भुसारी कॉलनी, बावधन खुर्द, शास्त्रीनगर, परमहंसनगर, सागर कॉलनी, महात्मा सोसायटी, चांदणी चौक, एनडीए रस्ता, कुंबरे टाउन, गुरू गणेशनगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:40 am

Web Title: name of development lack of facilities akp 94
Next Stories
1 साखर कारखाने, ग्रामपंचायतींसह महिला बचत गटही वीजबिल वसुलीत
2 राज्यातील तापमानात चढ-उताराचा अंदाज
3 ‘सीरम’मध्ये भीषण आग
Just Now!
X