‘कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर आपण इथवर असेच आलो का? हे सरकार शेतक ऱ्यांसाठी चांगले काम करत आहे. चांगल्याला चांगले म्हणा. मात्र आपल्याकडे सगळ्याला नावे ठेवण्यातच धन्यता मानली जाते,’ अशी टोलेबाजी करत नाना पाटेकर यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जगन्नाथ राठी व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेच्या पदवीदान समारंभात पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. मोहन स्वामी, सोसायटीचे विश्वस्त डॉ. श्रीकृष्ण कानेटकर उपस्थित होते.
‘येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला झेलत जगणे शिका. ते महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातून शिकायला मिळणार नाही. मी ज्या घरात जन्माला आलो त्याचा बिल्ला लावून फिरत नाही. दैन्याचे प्रदर्शन करू नका, त्याचा नवे काही शिकण्यासाठी संधी म्हणून उपयोग करा,’ असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन पाटेकर म्हणाले, ‘देशाला, व्यवस्थेला नावे ठेवण्यात धन्यता मांडणारी लोक आहेत. काही लोक किंवा राजकारणी गलिच्छही आहेत. मात्र काही चांगलेही आहेत. मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी चांगल्याला चांगले म्हणतो. कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणून चालणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण इथवर कसे आलो? हे सरकार शेतक ऱ्यांसाठी खूपच चांगले काम करत आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही, तर ती बदलून टाकण्याची क्षमता आहे, हे आपण आताच्या निवडणुकीत पाहिले. मात्र आपणही पुढाकार घ्यायला हवा.’’
‘‘मी केलेली भूमिका लोकांना आवडणे ही माझी गरज आहे. मी त्यासाठी काम करतो, पारितोषिकासाठी नाही. एखादी भूमिका मी करू शकतो कारण मी जे भोगले त्यातून माझी दु:खाची व्याख्याच बदलली. सनी देओलला ते जमेल असे नाही, कारण त्याला भूक काय असते ते माहिती नाही. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी सगळे करून ठेवले होते. त्यामुळे ते दु:ख त्याच्या चेहऱ्यावर येणार नाही,’’
‘समाजकारण, राजकारण, लोकसेवा हे विटलेले शब्द आहेत. ज्यात आनंद मिळेल ते करावे. नाम फाउंडेशनसाठी मला कोणतेही सन्मान, पद्म पुरस्कार वगैरे नकोत. मी हे सगळे पुरस्कारांसाठी केले नाही.’’
सुनावण्यासाठी निमित्त लागते..
विद्यार्थी आणि उपस्थितांच्या प्रश्नांना पाटेकर यांनी उत्तरे दिली. त्या वेळी माणिकचंदचे रसिकलाल धारीवाल यांच्याबरोबर पाटेकर एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचा संदर्भ देत ‘गुटखा विकून मोठे झालेल्या माणसाबरोबर तुम्ही व्यासपीठावर कसे बसलात?’ असा प्रश्न एका श्रोत्याने उपस्थित केला. त्या कार्यक्रमातील आपल्या फटकेबाजीची आठवण करून देत पाटेकर म्हणाले, ‘काही गोष्टी मांडण्यासाठी निमित्त लागते. मी त्या कार्यक्रमाला गेलो नसतो तर जे बोललो ते बोलता आले असते का?’