राज्यात करोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकाधिक लसचा पुरवठा करावा अशी मागणी आज आम्ही करीत आहोत. पण आपल्याच राज्यात करोना लस तयारी केली जात असून तीन वेगवेगळया प्रकारचे दर आकारले जात आहे. हे योग्य नसून आपला शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला लस मोफत देतात. आपल्याला दर आकारातात. यातून सरकार कशा पद्धतीने काम करते हे दिसून येत आहे, अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. आपली जनता म्हणून केंद्राने सर्वांना लसीकरण मोफत करायला हवे होते. मात्र तसे केले नाही, याबद्दलची खंतही पटोले यांनी बोलून दाखवली.

पुणे शहर आणि राज्यात लस उपलब्ध करून द्यावी. या मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, “लस बनविणारी कंपनी पुण्यात आहे. म्हणून आज इथे पुण्यात बोलत आहे. लॉकडाऊन नसता, तर आम्ही राज्यभर आंदोलन करणार होतो.”

“एका बाजूला आपल्या देशात करोनाची लाट कायम आहे. मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. जर आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले असते, तर अनेक लोकांचे प्राण वाचले असते. पण ते करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्याचबरोबर अनेक देशात लसीकरण चांगले झाले. मात्र आपल्या देशाच्या प्रमुखाने लसीकरण चांगल्या पद्धतीने करण्यात आलं नाही. ते चांगलं केलं असतं तर अनेक निरपराध लोक वाचले असते,” अशा शब्दांमध्ये पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

सध्याच्या परिस्थितीला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर झाला असून त्याला केंद्राच चुकीच धोरण जबाबदार असल्याचेही पटोले यांनी म्हटलं आहे.