फोल्डिंगच्या मखरांची परदेशातही निर्यात

सध्याच्या काळात माणसाला भेडसावणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न ध्यानात घेऊन नानासाहेब शेंडकर यांनी गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सजावट म्हणून पर्यावरणपूरक फोल्डिंगच्या मखरांची निर्मिती केली आहे. प्रदूषणाचे विसर्जन करण्याच्या उद्देशातून कागदी पुठ्ठय़ापासून बनविलेल्या या मखरांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशांतही मागणी आहे. गेल्या १५ वर्षांत पाचशेहून अधिक मखरांची जगभरातील विविध देशांमध्ये निर्यात झाली आहे.

आपल्या सर्वाचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनाची आपण सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहोत. शुक्रवारपासून (२५ ऑगस्ट) सुरू होत असलेला यंदाचा गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी विघटन होऊ न शकणाऱ्या थर्माकोलची आरास टाळून पर्यावरणपूरक कागदी फोल्डिंगच्या मखरांचा वापर केला जावा, हे नानासाहेब शेंडकर यांचे उद्दिष्ट आहे. शेंडकर हे थर्माकोल मोल्डिंगचे आद्य प्रवर्तक आहेत. मात्र, थर्माकोलमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी आपला दोनशे कामगार असलेला २५ वर्षे जुना कारखाना बंद केला आहे. संशोधन करून त्यांनी मोठय़ा कल्पकतेने पर्यावरणपूरक अशा आकर्षक कागदी मखरांची निर्मिती केली आहे. ‘चला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करूया.’ हे ब्रीद घेऊन शेंडकर यांनी ही नवी चळवळ सुरू केली आहे. शेंडकर हे मूळचे नगर जिल्ह्य़ातील लोणी मावळा गावचे. तेथे त्यांचा थर्माकोल मोल्डिंगचा कारखाना होता. जे. जे. कला महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या शेंडकर यांनी ५० चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. साईन एज अँड ग्राफिक्स आणि आर्टिस्ट ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून ते सध्या मखरांची निर्मिती करणारे नव्या पिढीतील कलाकार घडवीत आहेत.

मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे आपण सर्व जण हवालदिल झालेले आहोत. कडक उन्हाळा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे समाजाच्या सर्वच स्तरातील बंधू-भगिनींना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण, आपण सर्वानी विचार केला तर ही परिस्थिती आपणच निर्माण केलेली आहे. छोटय़ा-मोठय़ा चुकांमधून का होईना आपणच याला कारणीभूत आहोत. मग, आपल्या चुका आपणच सुधारायला नकोत का, या प्रश्नातून मला हा नवा मार्ग सापडला. गणेशोत्सव किंवा कोणताही सण साजरा करताना आपण निसर्गाशी असलेल्या आपल्या जबाबदारीचे भान ठेवूनच सण साजरा केला पाहिजे. थर्माकोलमुळे प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण होतो.

या कचऱ्याचे विघटनही होत नसल्यामुळे नदी-नाले व पाण्याचे इतर स्त्रोत तुंबले जातात आणि त्यामुळे पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होतो. गणेशोत्सवाच्या काळात तर लाखोंच्या संख्येने आपण गणरायाची सजावट करण्यासाठी थर्माकोलची मखरे वापरतो. या मखरांचा पुनर्वापर होत नसल्यामुळे आपण ती कचऱ्यात टाकून देतो. त्या कचऱ्याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे नदी-नाले प्रदूषित करण्यासाठी आपण नकळतपणे हातभार लावत असतो, अशी भूमिका शेंडकर यांनी मांडली. कागदी पुठ्ठय़ांपासून बनविलेली वेगवेगळ्या २५ डिझाईनमधील मखरे राज्यभरात ४० ठिकाणी उपलब्ध होत असून पुण्यामध्ये पाच ठिकाणी या मखरांची विक्री केंद्रं आहेत. घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे या मखरांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून शुक्रवापर्यंत (२५ ऑगस्ट) दररोज सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळात ते खुले राहणार आहे, अशी माहिती वेदान्त सिझनल्सचे सुबोध गरुड यांनी दिली.