देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी ऐतिहासीक वास्तु आहेत. मात्र आज पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन ऐतिहासिक नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात आल्याने, अशा वास्तू टिकवण्याची आपली जबाबदारी आहे. या वास्तुमध्ये १८५७ च्या युद्धाचा इतिहास पहायला मिळतो. इतिहासाचं चालतं बोलतं पुस्तक म्हणजे हा नानावाडा असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिकेच्यावतीने नानावाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या वाड्यातील तळमजल्यावर असणार्‍या ११ खोल्यात स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय काकडे, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार विजय काळे तसेच नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, नानावाड्याचे पुनरुज्जीवन आणि तळमजल्यावरील ११ खोल्यात स्वातंत्र्य पूर्व काळातील घडामोडी आणि क्रांतिकारकांचा जीवन प्रवास रेखाटला गेला आहे. या माध्यमातून पुढील पिढीला इतिहास जाणुन घेण्यास मदत होणार आहे, ही वास्तू कायम प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.