घुमान येथे होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नांदेडच्या नानक-साई फाउंडेशनतर्फे नांदेड ते घुमान अशी ‘भक्त नामदेव ग्रंथदिंडी’ काढण्यात येत असून, दिंडीमध्ये ३०० हून अधिक साहित्यिक व साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत.
अशी माहिती नानक-साई फाउंडेशनचे अध्यक्ष व ग्रंथदिंडीचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम, जसदीपसिंघ खालसा, जयप्रकाश सुरनर, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते. ३१ मार्च रोजी संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्य़ातील नरसी गावातून दिंडीला आंरभ होणार असून, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच साहित्य संमेलनात फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘भक्त नामदेव लाइफ टाइम अज्युमेंट अ‍ॅर्वार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. नरसी गावातून दिंडी निघून सचखंड गुरुद्वारात अरदास करून दिंडी सचखंड एक्सप्रेसने अमृतसरकडे रवाना होणार आहे. पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यातील आध्यात्मिक, सामाजिक बंधुप्रेम व ऋणानुबंधाचे संत नामदेवांनी निर्माण केलेले संबंध या ग्रंथदिंडीच्या माध्यमाने अधिक मजबूत होतील, असेही बोकारे यांनी या वेळी सांगितले.