राजकारण, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांनी आपापली जबाबदारी उचलून सर्वसमावेशक विकास आणि चांगल्या भारतासाठी संघटितपणे लढा द्यावा, असे आवाहन ‘इन्फोसिस’ चे संस्थापक डॉ. एन. आर. नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी केले. विकासाची फळे चाखण्यासाठी उद्योग जगाला मानवी विकासाचा विचार करावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथील अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते नारायण मूर्ती यांना अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘दिव्य मराठी’ चे संपादक कुमार केतकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां सुधा मूर्ती, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले, विश्वस्त पी. एन. जोशी आणि श्रीकांत जोशी याप्रसंगी उपस्थित होते.
नारायण मूर्ती म्हणाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारत प्रगतिपथावर आहे. देशाचा विकास दर वाढत आहे. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीमध्ये भारत हा चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही परिस्थिती एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला वेगळेच चित्र समोर आले आहे. देशातील ४० कोटी लोकांचे दररोजचे उत्पन्न १५ रुपयांपेक्षाही कमी आहे. देशातील प्राथमिक आरोग्य सुविधा अत्यंत सामान्य आहे, तर ५० टक्के शाळा या एकशिक्षकी आहेत. मानवी विकास निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक तळाच्या देशांमध्ये आहे. या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी उद्योग जगाने योगदान दिले पाहिजे. केवळ अधिकाधिक आर्थिक संपत्ती कमावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यापेक्षाही ‘बिईंग गुड’ साठी आपण काय करू शकतो याचा विचार झाला पाहिजे.
‘इन्फोसिस’ तर्फे १३ लाख विद्यार्थ्यांना शाळेमध्येच अन्न पुरविले जात आहे. अत्यल्प उत्पन्न गटाचे विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये ग्रंथालय विकसित करण्यात आले आहे. रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण आणि नागरी भागाच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत, असे सांगून नारायण मूर्ती म्हणाले, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशाच्या विकासामध्ये योगदान देता येते हे बांगलादेशातील ग्रामीण बँकेच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. नागरिकांमध्ये उद्योजकता, स्पर्धात्मकता विकसित करण्याबरोबरच वैश्विक पातळीवर उभे करण्यामध्ये उद्योग क्षेत्राने वाटा उचलण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेमध्ये उद्योग क्षेत्रातर्फे दरवर्षी ९.१ टक्के उत्पन्न धर्मादाय उपक्रमांसाठी दिले जाते. भारतामध्ये हे प्रमाण केवळ ३.१ टक्के आहे. त्यामध्ये वाढ करून देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी उद्योजकांनी संघटित होऊन समस्या निराकरणामध्ये भरीव योगदान देण्याची आवश्यकता आहे.
 
पुण्याशी अनोखे नाते
श्रोत्यांनी उभे राहून दाटीवाटीने या कार्यक्रमाला गर्दी केली होती. नियोजित वेळेपेक्षा पाच मिनिटे आधी कार्यक्रम संपल्यामुळे सुधा मूर्ती यांना मनोगत व्यक्त करावे, असा आग्रह श्रोत्यांनी धरला. सुधा मूर्ती यांनी पुण्याशी आमचे दोघांचेही अनोखे नाते असल्याची भावना व्यक्त केली. डेक्कन चित्रपटगृह येथे ‘जगाच्या पाठीवर’ आणि ‘प्रभात’ मध्ये ‘अमर भूपाळी’ हे चित्रपट आम्ही पाहिले आहेत. अर्थात नारायण मूर्ती यांना मराठी समजले नाही. पण, त्यांनी हा आनंद लुटला. प्रागतिक विचारांमध्ये पुणे आघाडीवर असल्याने मला नेहमीच पुण्यात यायला आवडते.