‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण खात्याकडे (सीबीआय) देऊन एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून पुण्यात आकुर्डी आणि खडकीमध्ये सीबीआयचे कार्यालय असतानाही तपास मुंबईतून का चालतो याबाबत समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. सीबीआय खाते पंतप्रधानांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असून त्यांनी स्वत: पंतप्रधानांना पत्र पाठवल्याचे आम्हाला सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फेही मोदी यांची भेट मिळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्रे पाठवलेली आहेत. परंतु सातत्याने प्रयत्न करूनही पंतप्रधानांची भेट मिळू शकलेली नाही,’ असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
राज्य व केंद्र शासन डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबद्दल गंभीर नसल्याची शंका व्यक्त करून हा तपास आता न्यायालयाच्या देखरेखीत व्हावा, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात अभय नेवगी यांच्यामार्फत दाखल करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
दाभोलकर हत्येचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरण न्यायालयात लवकर सुनावणीस यावे अशी अपेक्षा डॉ हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देऊन वर्ष उलटले आहे, परंतु तपासात प्रगती झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून बदली झाल्याचेही समोर आले. याबद्दल दाभोलकर कुटुंबीयांना काहीही कळवले गेले नाही. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, सतीश शेट्टी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सुरू असताना मारेक ऱ्यांचा शोध न लागणे ही मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे.’
दाभोलकर व पानसरे हत्यांच्या निषेधासाठी अभियान
डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या निषेधार्थ व तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे २० जुलैपासून ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे अभियान सुरू केले जाणार आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्याव्यापी धरणे आंदोलनाने अभियानास सुरुवात केली जाईल. तसेच १८ ते २० जुलै दरम्यान मुंबईत ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगण नाटय़ाचे प्रयोगही होणार आहेत.