डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित विक्रम भावे याचा जामीन विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी शनिवारी फेटाळून लावला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात भावेचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकरने दिलेल्या जबाबानुसार भावेला अटक करण्यात आली होती. कळसकरचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्याकडे भावे कामाला आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे भावेला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी युक्तिवादात केली होती. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी बचाव पक्षाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला विरोध केला. भावेला जामीन मंजूर करण्यात येऊ नये. त्याला एका प्रकरणात न्यायालयाने दहा वर्ष शिक्षा सुनावली होती. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात भावेने घटनास्थळाची पाहणी केली होती. कळसकर आणि अंदुरेला त्याने मदत केली होती. प्रथमदर्शनी भावेचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात हात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, असे अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी युक्तिवादात नमूद केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर भावेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

अ‍ॅड. पुनाळेकर यांना काही महिन्यांपूर्वी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याला डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला अ‍ॅड. पुनाळेकर यांनी  दिला होता, असे सीबीआयने म्हटले होते.