खरा चेहरा लोकांना कळू नये यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुखवटा धारण केला असून, मोदी म्हणजे केवळ मृगजळ आहे, अशी टीका केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी रविवारी केली.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष अभय छाजेड आदी त्या वेळी उपस्थित होते.
सिब्बल यांनी भाषणामध्ये प्रामुख्याने मोदी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले,‘‘ मोदी हे केवळ दुरूनच चमकतात. जवळ गेल्यावर त्यांचा खरा चेहरा समोर येतो. त्यांचे राजकारण पीआर एजन्सीचे आहे. इंटरनेट, ट्विटर, अपशब्द व विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. १९९१ च्या सुमारास मोदी राजकारणात दिसत नव्हते, असतील तर मला माहित नाही. त्या वेळी गुजरातमधील जितक्या गावांत वीज होती तितक्याच गावात आज वीज आहे. रस्ते व कृषी क्षेत्रातही मोदींनी क्रांतिकारी काम केलेले नाही. केवळ त्याचा आभास निर्माण केला. मोदी यांच्या काळातच गरिबीत वाढ झाली. काँग्रेस धर्मनिरपेक्षवादी आहे. मोदी यांच्यामुळे नव्हे, तर धर्मनिरपेक्षवादानेच भारताची प्रगती होईल.’’
लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांनी तयारी सुरू केल्याचे सांगून सिब्बल म्हणाले,‘‘रोज नवे प्रश्न उपस्थित करून वृत्त वाहिन्यांवर चर्चा केली जात आहे.आम्ही येणाऱ्या काळात या प्रश्नांना चोख उत्तर देऊ. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्ये आहे. विकासाचा कार्यक्रम घेऊन काँग्रेस पुढे जातो आहे. काँग्रेसला सत्तेपासून बाहेर काढणे, हाच विरोधी पक्षांचा सध्याचा एकमेव कार्यक्रम आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. विरोधकांकडून गांधी परिवाराची भाषा केली जाते, पण त्यांना तर कोणता परिवारच नाही. विरोधकांतील प्रत्येकाला केवळ पंतप्रधान होण्याची घाई झाली असून, त्यासाठी त्यांच्यातच भांडणे सुरू आहेत.
महाराष्ट्र आजही ‘नंबर वन’ च- मुख्यमंत्री
कोणी कितीही वल्गना केल्या, तरी महाराष्ट्र उद्योगाच्या क्षेत्रामध्ये ‘नंबर वन’च आहे, असे पुन्हा एकदा सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. ते म्हणाले,की औद्योगिक विकासात राज्याची आघाडी कायम आहे. देशातील परकीय गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक राज्यात आहे. पुढील काळात पाच लाख कोटीची नवी गुंतवणूक व २० लाख नवे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विरोधकांबाबत ते म्हणाले, जात, धर्म व प्रांतवादावर बोलून व सवंग लोकप्रियता मिळवून त्यातून राजकारण साधण्याचा प्रयोग विरोधकांकडून होतो आहे. देशाचा विचार करणारा पक्ष केवळ काँग्रेस आहे. अफवा व खोटय़ा बातम्यांचा प्रचार केला जात असल्याने केलेली विकासकामे काँग्रेस पक्षाकडून पुढे ठेवली जाणार आहेत.