चिन्मय पाटणकर – chinmay.reporter@gmail.com

स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षितेबाबत सेफ वर्कप्लेसेस या अभिवाचनातून जनजागृती केली जात आहे. सध्याच्या काळात चर्चेत असलेला हा मुद्दा सर्जनशील पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या ‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न अधिक व्यापक स्वरूपात समोर आला आहे. केवळ घरातच नाही, तर कामाच्या ठिकाणीही वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांचं शोषण केलं जातं. शाळा-महाविद्यालयांपासून चित्रपटसृष्टी, माध्यमांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. कामाची ठिकाणे सुरक्षित असलीच पाहिजेत, हा विचार मांडण्यासाठी नारी समता मंच अभिनव प्रयोग करत आहे. ‘सेफ वर्कप्लेसेस’ या दीर्घाकाच्या माध्यमातून कामाचं ठिकाण सुरक्षित असण्याबाबतचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे.

काही वर्षांपूर्वी भंवरीदेवी यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण गाजलं होतं. त्या प्रकरणानंतर कामाचं ठिकाण सुरक्षित असणं आवश्यक असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विशाखा मार्गदर्शक तत्त्व आली. पुढे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ  (प्रतिबंध, मनाई आणि तक्रार निवारण) अधिनियम २०१३ हा कायदा झाला. कायदा झाल्यावर सगळ्याच गोष्टी सुधारतात असं नाही. कारण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचाही प्रश्न असतो. कायदा, त्यातील तरतुदी समजून घेऊन त्याचा जागरूकपणे उपयोग करण्यासाठी त्या बाबत जनजागृती आवश्यक आहे. कायद्याची माहिती देतानाच मुळात लैंगिक छळ म्हणजे काय, त्याची व्याप्ती, तक्रार कशी करायची, तक्रार करताना येणारी विविध प्रकारची आव्हानं, अंतर्गत तक्रार समिती, गुन्हा घडलेल्या ठिकाणी चौकशी आणि न्याय, समितीच्या शिफारसी, अंमलबजावणी या सगळ्याची नाटय़मय पद्धतीने मांडणी या ‘सेफ वर्कप्लेसेस’ या नाटकात केली आहे. अक्षय वाटवे यांनी अभिवाचनाचं दिग्दर्शन केलं आहे. तर सायली सहस्रबुद्धे, अक्षय वाटवे, वैशाली जाधव, अतुल कुलकर्णी आणि प्रीती करमकर अभिवाचक आहेत.

‘गेली तीस वर्षे सामाजिक चळवळींमध्ये काम करत होतो. लैंगिक शोषणाच्या प्रकाराबाबत आपल्याकडे फार संवाद होत नाही. केवळ बलात्कार म्हणजे लैंगिक शोषण नाही. त्यामुळे या विषयाचं भान निर्माण होण्याची गरज आहे. आज मुलींनी शिक्षण घेतल्यानंतरही त्यांच्या शोषणाची भीती कायम आहेच. कारण, स्त्रिया विविध ठिकाणी काम करतात. मात्र, त्यांचा प्रवास, त्यांच्या कामाचं ठिकाण सुरक्षित असण्याबद्दलचा प्रश्न आहे. कामाचं ठिकाण सुरक्षित असण्याबद्दल काम देणाऱ्यानं काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे हा विषय मांडण्यासाठी नाटक हे माध्यम वापरण्याचं ठरवलं. हॅशटॅग मीटू विल रिपोर्ट हे नाटक लिहिलं. त्यातील कामाच्या ठिकाणाच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी या नाटकातून सेफ वर्कप्लेसेस हा स्वतंत्र दीर्घाक लिहिला,’ असं लेखक संदीप मसहूर यांनी सांगितलं.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय प्रभावीपणे, सर्जनशील पद्धतीने मांडण्यासाठी नारी समता मंचाने पुढाकार घेतला. नाटक हे माध्यम महत्त्वाचं आहे. येत्या काळात हा दीर्घाक अधिकाअधिक ठिकाणी करण्याचा मनोदय आहे, असं नारी समता मंचाच्या प्रीती करमरकर म्हणाल्या.