स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांचे मत
जे नर्मदा परिक्रमा करतात, त्यांना नर्मदा माता आशीर्वाद देतेच. परंतु वेळोवेळी त्यांची परीक्षा देखील घेते. नर्मदेचा काठ ही एक शाळा आहे. जीवनात आपल्याला जे काही शिकता येत नाही, ते सर्व नर्मदा मातेच्या परिक्रमेदरम्यान आपण शिकतो. जीवनाच्या उत्कर्षांसाठी आवश्यक ते सर्व परिक्रमेदरम्यान आपल्याला ज्ञात होते. नर्मदा परिक्रमेच्या आधीचे आयुष्य आणि नंतरचे आयुष्य यात आमूलाग्र बदल आपल्याला निश्चित दिसून येतो, असे मत माता स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
नर्मदा प्रेमी मंडळतर्फे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्या ‘ब्रह्ममायेच्या तीरावरील नर्मदा परिक्रमा’ या पुस्तकाचे प्रकाशन स्थितप्रज्ञानंद सरस्वती आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. सुधीर गाडगीळ, बाळासाहेब दाभेकर, शोभना जोशी, शुभदा जोशी, साहित्य दरबारचे विनायक धारणे, मिलिंद शिरगोपीकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जोशी यांनी ९४ दिवसांत नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करून घेतलेले अनुभव या पुस्तकामध्ये आहेत.
स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, नर्मदा मातेचा महिमा अगाध आहे. १८ पुराणांत अनेक श्लोकांमध्ये नर्मदा मातेचे गुणगान गायले आहे. नर्मदा ही केवळ नदी नाही, तर ती मातास्वरूप आहे. तिच्या काठावर ६७ हजार ७०० तीर्थ वसलेली आहेत. केवळ साधू संत नाही, तर देवदेवतांनी देखील नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या केली आहे.
बापट म्हणाले, िहदू संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी आहेत, की ज्यांची अनुभूती आपण घ्यायला हवी. नर्मदा परिक्रमा ही त्यातीलच एक अनुभूती घ्यावी, अशी परिक्रमा आहे. प्रत्यक्ष ज्यांनी परिक्रमा केली, त्यांचे अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. ते समोर ठेवून प्रत्येकाने परिक्रमा करायला हवी.
जोशी म्हणाले, भक्ती आणि श्रद्धा असेल, तर नर्मदा परिक्रमा नक्कीच पूर्ण होते. परिक्रमा मार्गावर राहणारे लोक स्वत: उपाशी राहून परिक्रमावासीयांची सेवा करतात. त्यामुळे आम्ही परिक्रमा मार्गावरील आदिवासी पाडय़ांमध्ये सौर ऊर्जेचा प्रसार करून जनजागृती करीत त्यांच्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनूप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

उदय जोशी लिखित ‘ब्रह्ममायेच्या तीरावरील नर्मदा परिक्रमा’ या पुस्तकाचे प्रकाशन स्थितप्रज्ञानंद सरस्वती आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शोभना जोशी, शुभदा जोशी आणि सुधीर गाडगीळ उपस्थित होते.