प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची अपेक्षा

मुस्लीम धर्मातील अनिष्ट गोष्टींना हमीद दलवाई यांनी नेटाने विरोध केला. तिहेरी तलाकमुळे महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. तिहेरी तलाक पद्धतीला विरोध करण्यासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या निर्णयामागे हमीद दलवाई यांचे योगदान विसरता येणार नाही. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याविषयी सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. ती उणीव दूर होऊन ‘अनसंग ह्य़ूमॅनिस्ट’ सर्वांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी रविवारी व्यक्त केली.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या ‘हमीद : द अनसंग ह्य़ूमॅनिस्ट’ या लघुपटाचे प्रदर्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात आले. या लघुपटामध्ये निवेदकाची भूमिका करणारे नसिरुद्दीन शाह, अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. हमीद दाभोलकर आणि लघुपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शिका ज्योती सुभाष या वेळी उपस्थित होत्या.

शाह म्हणाले, ज्योती सुभाष यांनी माहितीपटाबाबत कल्पना दिल्यानंतर मी हमीदभाईंचे साहित्य वाचले. ‘भारतातील मुस्लिमांचे राजकारण’ आणि ‘इंधन’ ही पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यांचे मूलगामी विचार आणि कार्याचा परीघ पाहून मी भारावून गेलो. दुर्दैवाने त्यांना आयुष्य कमी लाभले याचे शल्य वाटते. सध्याच्या काळात त्यांच्या विचारांचा जागर युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

माझ्या लहानपणी हमीद दलवाई यांना पाहिले होते, असे सांगून ज्योती सुभाष म्हणाल्या, महाराष्ट्र फौंडेशनने त्यांना मरणोत्तर जीवनगौरव  पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांचे साहित्य पुन्हा एकदा वाचले. हे अलौकिक व्यक्तिमत्त्व युवा पिढीला समजावे यासाठी हा लघुपट केला. हमीद दलवाई यांच्याविषयी माहिती समजताच नसिरुद्दीन शाह यांनाही या कामामध्ये सहभागी व्हावे असे वाटले.

अमृता सुभाष म्हणाल्या, ‘दलवाई कायम उत्साहाने रसरसलेले असायचे असे सांगितले जाते. त्यांच्यासारखा मनस्वी माणूस एकदा प्रत्यक्षात बघायला मिळायला हवा होता असे वाटते. त्यामुळे ही लघुचित्रफीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आईची इच्छा पूर्ण होईल. आईची मैत्रीण आणि कर्नाटकातील ज्येष्ठ रंगकर्मी-गायिका बी. जयश्री यांच्या आवाजात एक गीत ध्वनिमुद्रित केले आहे.

दाभोलकर म्हणाले, हा लघुपट खूप पूर्वी व्हायला हवा होता. दलवाई यांच्या नावावरून माझे नाव ठेवण्यात आले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि कट्टरता वाढत असतानाच्या काळात हमीद दलवाई यांचे विचार कालसुसंगत वाटतात.