मेलहेम आयकॉसबरोबर तीस वर्षांसाठी करार

नाशिक महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे काम पुण्यातील मेलहेम आयकॉस या कंपनीला देण्यात आले आहे. नाशिक शहरातील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाचे काम ही कंपनी तीस वर्षांसाठी करणार असून या कामांमध्ये खतनिर्मिती, इंधननिर्मिती, प्रकल्पांची दुरुस्ती, सध्याची कचरा टाकण्याची जागा बंद करून ती शास्त्रशुद्ध रीतीने भरून घेणे आदी अनेक कामांचा समावेश आहे. दिवसाला चारशे टन घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम ही कंपनी नाशिकमध्ये करणार आहे.

मेलहेम आयकॉस एन्व्हॉयर्मेट ही कंपनी कचरा व्यवस्थापन समस्यांवरील उपाययोजना राबविते. कचरा व्यवस्थापनासाठी जीआयझेड या जर्मन सल्लागार संस्थेच्या मदतीने नाशिक महापालिकेने कचरा व्यवस्थापनाची कामे देण्यासाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवली होती. त्या प्रक्रियेनंतर मेलहेम आयकॉस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या सध्याच्या बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण या महत्त्वपूर्ण कामाचाही समावेश या निविदेत करण्यात आला आहे. प्लॅस्टिकपासून इंधन तयार करण्याचाही प्रकल्प कंपनीकडून सुरू करण्यात येणार असून प्रकल्पातील कचरावेचकांसाठी स्वयंसाहाय्य गट स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्यासाठी विविध सेवा-सुविधाही कंपनीकडून दिल्या जाणार आहेत. ‘ल्होटेलिएर आयकॉस ग्रुप या फ्रेंच भागीदारांच्या सहकार्याने मेलहेम आयकॉस हा नाशिकचा नागरी घनकचरा क्षेत्रातील प्रकल्प यशस्वी होईल,’ असा विश्वास मेलहेम आयकॉसचे कार्यकारी संचालक (निवृत्त) कर्नल सुरेश रेगे यांनी व्यक्त केला. पुढील चार ते पाच वर्षांत कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्पही उभारण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

मेलहेमने देशभरात अनेक ठिकाणी कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचे प्रकल्प उभे केले असून पुण्यातही कात्रज येथे कंपनीचा असा प्रकल्प आहे. कचरा व्यवस्थापन क्षेत्रात विविध प्रकल्प राबवण्याचे काम कंपनीतर्फे अनेक शहरांमध्ये सुरू आहे. शास्त्रीय पद्धतीने कचरा जमिनीत मुरवणे, खत निर्मिती आदी प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.