महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली आहे. हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर ३-२ ने मात केली. पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहेत. त्यामुळे हा विजय माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही महत्वाचा मानला जात होता.

शैलेश  आणि हर्षवर्धन हे एकाच तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. अति बचावात्मक कुस्ती खेळल्यामुळे पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला. दुसऱ्या डावातही दोन्ही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. दुसरा डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावत बरोबरी साधली. मात्र शेवटच्या १-० सेकंदात हर्षवर्धनने निर्णयाक डाव टाकत महत्वाच्या दोन गुणांची कमाई करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.