‘या तुफानाला कुणी घर देता का घर’.. ‘टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हाच खरा प्रश्न आहे’.. काळीज चिरणारा एके काळच्या ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकर यांचा आवाज.. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून साकारलेले नटसम्राट गिरीश देशपांडे यांच्या रूपामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अवतरले. रंगमंच तोच, कलाकार तेच पण, प्रत्येक प्रयोगाला आलेल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांनी हा नटसम्राट नव्याने अनुभवला आणि सलग आठ प्रयोग सादरीकरणाच्या विश्वविक्रमाकडे ‘नटसम्राट’ची घोडदौड सुरू झाली.
तीर्थराज, रंगमैत्री, दादा कोंडके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नटसम्राट नाटकाच्या सलग आठ प्रयोगांना मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरुवात झाली. ३१ तास आणि ४५ मिनिटे या कालावधीत या नाटकाचे सलग आठ प्रयोग सादर करुन ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमाची नोंद करण्याच्या दृष्टीने हे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पावणेसहा वाजता या उपक्रमातील पहिल्या प्रयोगासाठी पडदा वर गेला. दादा कोंडके फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, सचिव राजेंद्र भवाळकर, विक्रम जाधव, नाटय़निर्माते विजय जोशी या प्रसंगी उपस्थित होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून तेच नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारत आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी (२८ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता विश्वविक्रमी आठवा प्रयोग होत असून त्याला ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी याच नाटकाचे पाच प्रयोग करून ‘लिम्का बुक’मध्ये नोंद केली आहे. आता सलग आठ प्रयोग करून अमेरिकेतील सेव्हन ओ क्लॉक नाटय़संस्थेच्या नावावर असलेला २३ तास ३० मिनिटे आणि ५४ सेकंदांचा विक्रम मोडून मराठी रंगभूमीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे गिरीश देशपांडे यांनी सांगितले.