मुंबईच्या आरे कॉलनीतील जागा निश्चित

पुणे : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावरून देशभर चर्चा सुरू असतानाच, राज्यातील कलाकारांना अभिव्यक्तीसाठी दीर्घकाळ प्रलंबित असणारे कला व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या विभागीय केंद्राचे राज्याच्या राजधानीमध्ये आगमन होणार आहे. त्यासाठी मुंबईच्या आरे कॉलनीतील जागा निश्चित करण्यात आली असून पंतप्रधान कार्यालय आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित सहकार्याने येत्या सहा महिन्यांत हे केंद्र सुरू होणार आहे.

राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिल्पकार-चित्रकार उत्तम पाचारणे यांनी ही माहिती दिली. ‘महाराष्ट्राच्या कलासंपन्न भूमीत ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र असावे, ही प्रलंबित मागणी नजीकच्या काळात पूर्ण होत आहे. त्यासाठी अनेक कलाकारांनी केलेल्या प्रयत्नांची परिपूर्ती होत असल्याचा आनंद वाटतो, असे पाचारणे यांनी स्पष्ट केले. मी मराठी मातीत घडलेला शिल्पकार आहे. आपल्या राज्यात विभागीय केंद्र असावे, हे स्वप्न आता मी अकादमीचा अध्यक्ष असताना साकारत असल्याचा विशेष आनंद वाटतो. या केंद्रामुळे महाराष्ट्रातील शिल्पकार-चित्रकारांना कलेच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र असावे, यासाठी शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासून हालचाली सुरू झाल्या होत्या. आरे कॉलनीत पंधरा एकरांचा भूखंड त्यासाठी राखून ठेवला होता. प्रत्यक्षात विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना, त्यांनी ही जागा सुभाष घई यांच्या संस्थेला दिली. त्या विरोधात अनेक कलाकारांनी आवाज उठवला. छोटी-मोठी आंदोलनेही झाली. त्या जागेबाबत कलाकार आग्रही होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत पुन्हा पाठपुरावा करून अकादमीच्या विभागीय केंद्राचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्यासह अनेकांनी केले. त्याला आता यश मिळत आहे, असेही पाचारणे यांनी सांगितले.

देशाच्या विविध भागांत अकादमीची विभागीय केंद्रे कार्यरत आहेत. कलासंपन्न महाराष्ट्रात इतक्या वर्षांत विभागीय केंद्र का नसावे, असा प्रश्न कलाविश्वामध्ये उपस्थित केला जात होता.

राष्ट्रीय ललित कला अकादमी केंद्रात काय?

* गोरेगाव आरे कॉलनी येथील सुमारे पाच एकर परिसरात केंद्र.

* प्रामुख्याने शिल्पकला आणि चित्रकलेसाठीचे मुक्त व्यासपीठ.

* कला प्रशिक्षणाची सोय आणि कलावस्तूंच्या प्रदर्शनाची सुविधा.

* मान्यवर कलाकारांचे मार्गदर्शन.

* संदर्भ ग्रंथालयाप्रमाणे कलावस्तूंचे संग्रहालय.