२५ विभागांपैकी सहाच विभागांतून जेमतेम ३० अर्ज

नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्कसह (एनआयआरएफ) जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या मानांकन यादीमध्ये संशोधन आणि स्वामित्व हक्कांवर विशेष भर दिला जात असूनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला गेल्या दहा वर्षांत केवळ १६ स्वामित्व हक्क मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ‘प्रतिष्ठित संस्था’ दर्जासाठी (इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स) प्रयत्न करणाऱ्या विद्यापीठातील संशोधनाची ‘गती’ स्पष्ट झाली आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’तर्फे २००८ ते २०१८ या काळातील स्वामित्व हक्कांचा तपशील माहितीच्या अधिकारात मागण्यात आला होता. त्यावर विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती हाती आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विद्यापीठ स्तरावरील संशोधन, स्वामित्व हक्क, बौद्धिक संपदा अधिकार यांवर भर दिला जात आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून संशोधनासाठी प्रोत्साहनपर पाठय़वृत्ती दिल्या जातात. विद्यापीठाकडूनही प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रोत्साहन निधी, सुविधा पुरवण्यात येतात. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष संशोधन करून स्वामित्व हक्क मिळण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटत नसल्याचे या माहितीवरून स्पष्ट होत आहे.

विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेअंतर्गत एकूण २५ विभाग कार्यरत आहेत. मात्र, स्वामित्व हक्कांसाठी वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवमाहितीशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागातून प्रत्येकी तीन  प्राणिशास्त्र आणि उपकरणशास्त्र विभागातून प्रत्येकी एक, तर एकटय़ा तंत्रज्ञान विभागातून १९ असे एकूण ३० अर्ज दाखल करण्यात आले.

या ३० अर्जापैकी केवळ १६ अर्जावरच स्वामित्व हक्कांची मोहोर उमटल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

एकाच प्राध्यापकाकडे १५ स्वामित्व हक्क

विद्यापीठाला मिळालेल्या एकूण १६ स्वामित्व हक्कांपैकी १५ स्वामित्व हक्क एकाच प्राध्यापकाच्या नावावर असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांना हे स्वामित्व हक्क आहेत. डॉ. अभ्यंकर यांनी एकूण १९ अर्ज केले होते. त्यातील १५ स्वामित्व हक्क त्यांनाच मिळाले, तर चार अर्जाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अन्य विभागांतील प्राध्यापकांच्या संशोधनाचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कायद्यानुसार स्वामित्व हक्क प्रकाशित झाल्यानंतर संशोधकाला त्याच्या संशोधनाचे उद्योग-व्यवसाय निर्मितीसाठीचे जवळपास पूर्ण अधिकार प्राप्त होतात. आपल्याकडे स्वामित्व हक्कांसंदर्भातील पूर्ण जागृती होण्याची आवश्यकता आहे. – प्रा. गणेश हिंगमिरे, स्वामित्व हक्क तज्ज्ञ