चारुदत्त आफळे  राष्ट्रीय कीर्तनकार

शाळेबरोबरच मी कीर्तन महाविद्यालयातदेखील यायचे, असा बाबांचा म्हणजेच राष्ट्रीय कीर्तनकार गोिवदस्वामी आफळे यांचा हट्ट असायचा. नुसते कीर्तन ऐकायला किंवा शिकायला यायचे नाही, तर आख्यान सांगण्यासोबतच त्याविषयासंबंधी किमान दहा पुस्तकांची नावे सांगायला लागत. पुस्तकांची नावे माहिती नसली, तर आम्ही अडचणीत यायचो. अपुऱ्या माहितीने आपण कीर्तनातून प्रकट होऊ नये, असा बाबांचा दंडकच असायचा. त्यामुळे शालेय जीवनातच अवांतर वाचनाला मी प्रवृत्त झालो. कीर्तन महाविद्यालयामुळे बाबांच्या संग्रहात तीन हजारांहून अधिक पुस्तके होती. त्यातील बहुतेक पुस्तके दुर्मीळ असल्याने आम्हा सगळ्यांना त्या संग्रहाविषयी अप्रूप वाटे. कीर्तन महाविद्यालयापासून सुरू झालेली ही वाचनाची गोडी वाढत गेली आणि परदेशात कीर्तन सादर करताना लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचनात आलेले संदर्भ उपयोगी पडतात, ते बाबांनी लावलेल्या वाचनाच्या गोडीमुळे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

ऐतिहासिक पुस्तके, चरित्रग्रंथ, कादंबरी, धार्मिक पुस्तकांमध्ये रामायण, महाभारत आणि आध्यात्मिक पुस्तकांमध्ये संतवाङ्मय, हरिपाठ, दासबोध यांसारख्या साहित्यापासून वाचनप्रवास सुरू झाला. कीर्तन महाविद्यालयात वाचलेली पुस्तके मला वाचनाच्या आणखी जवळ नेत होती. आम्ही केवळ पुस्तक वाचून थांबायचो नाही. पुस्तकावर चर्चा करायची, त्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि पान क्रमांकाच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे हजारो पुस्तके वाचनात आली असली, तरी नेमके कोणते संदर्भ उपयोगी आहेत हे मला नोंदींमधून लगेच समजत होते. शाळेमध्ये कृ. पं. देशपांडे हे शिक्षक मला मराठी आणि इतिहास विषय शिकवायला होते. ते स्वत: लेखक असल्याने त्यांच्याकडे अनेक पुस्तके होती. मराठी आणि इतिहासाच्या अनुषंगाने इतर पुस्तकांची माहितीदेखील ते देत असत. त्यामुळे कवी मोरोपंत, दासोपंत यांची पुस्तके वाचनात येत होती. हळूहळू हे वाचनाचे वेड वाढत गेले आणि ग्रंथालयात कोणते पुस्तक आले, याची उत्सुकता असायची. पुस्तक वाचनानंतर त्यामधील कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या आवडल्या नाहीत, हे देशपांडेसरांना आम्ही सांगत असू. त्यामुळे ग्रंथालयात जाऊन पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार यांच्या पुस्तकांसोबतच सामाजिक नाटकांचे अवांतर वाचन करण्यासाठी मी प्रवृत्त झालो.

पुणे विद्यार्थी गृहात शालेय शिक्षण घेतल्यानंतर स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचे साहित्य हातात पडले आणि मी भारावून गेलो. योगशास्त्रावरील अय्यंगारांचे चरित्र, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके वाचू लागलो. घरात कीर्तनाचे वातावरण असल्याने विविध विषयांसंबंधी चर्चा होत. कीर्तन करताना संबंधित विषयाची संपूर्ण माहिती असावी, असा बाबांचा अट्टाहास होता. त्यामुळे त्या त्या विषयांतील माहिती आपल्याला असावी, त्यासाठी आपणही खूप वाचन करायला हवे असे मला नेहमी वाटायचे. र्सवकष ज्ञान मिळविण्याची ती ओढ मला सुधीर फडके, जयंत नारळीकर यांच्या अनुभवकथनावरील पुस्तकांपर्यंत घेऊन गेली. नुसत्या गोष्टी वाचण्यापेक्षा तत्त्वज्ञानात्मक पुस्तके वाचायला मला जास्त आवडायची. त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांप्रमाणेच गीतेचे तत्त्वज्ञान वाचायला मी सुरुवात केली.

महाविद्यालयात दर तीन ते चार महिन्यांनी वादविवाद स्पर्धा होत असे. त्यामध्ये मी उत्साहाने सहभागी होत होतो. त्याची पूर्वतयारी म्हणून दिलेल्या विषयावर महाविद्यालयात वादविवाद आणि चर्चा होत. मगच स्पध्रेकरिता आम्ही जात असू. नगर येथे झालेल्या एका स्पध्रेत गीता भक्तियोग विषयावर अचानक विरुद्ध बाजूने बोलायची वेळ आली आणि संघ म्हणून आम्ही काहीसे घाबरलो. आम्ही आठ जण एकत्र बसलो आणि गीतेचे अभ्यासक भाऊ कुलकर्णी यांना दूरध्वनी करून काय मांडायचे, यावर चर्चा केली. त्यावेळी ती परिस्थिती निभावली गेली खरी. परंतु अवघ्या दहा मिनिटांत पक्ष बदल करून विरुद्ध बाजूने बोलायचे, याची कल्पना करूनच घाम फुटला. तेव्हापासूनच कोणत्याही विषयाचे सविस्तर वाचन करायचे आणि तेही दोन्ही बाजूने, हे मनाशी पक्के केले.

घरामध्ये कीर्तनाचे संस्कार असल्याने मी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच कीर्तन करू लागलो होतो. परंतु २१ व्या वर्षी महाविद्यालयात शिकत असताना पहिले कीर्तन केले, ते सातारा जिल्ह्य़ातील माहुली या आमच्या मूळ गावी. वार्षकि उत्सवात समर्थ रामदास या विषयावरील कीर्तनाने मला वेगळेच बळ मिळाले आणि माझा कीर्तनप्रवास सुरू झाला. पहिले महायुद्ध, गणेशाचे युद्धतंत्र, कचरा निर्मूलन, कोरडवाहू जमिनीत बोराची शेती, १९७१ चे युद्ध, पाणी अडवा पाणी जिरवा, प्रदूषणमुक्ती या विषयांपासून ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे चरित्र आणि ई कचरा अशा विषयांवर कीर्तन करायचे म्हणजे तसे कठीणच. परंतु यामध्ये मला साथ मिळाली, ती पुस्तकांची. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्याने कीर्तन आणि नंतरची चर्चा करताना मी समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून विषय मांडू लागलो. काही विषय तसे अजबच असायचे, त्यामुळे काळानुसार माहितीमध्ये भर घालणे मला अपरिहार्य होते. त्याप्रमाणे कधी वर्तमानपत्रे, मासिके यांचे वाचन, तर कधी इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेत मी जात असे. नाटकांमधून काम करतानाही वाचनाचा खूप उपयोग झाला. व. पु. काळे, रत्नाकर मतकरी, द. मा. मिरासदार आणि पु. ल. देशपांडे यांची पुस्तके मला फार आवडत. तर चंद्रशेखर गोखलेंपासून ते संदीप खरे यांच्यापर्यंत अनेकांचे कवितासंग्रह मी वाचले आहेत. दर दोन-चार महिन्यांनी पुस्तकालयाला भेट द्यायची आणि कोणते नवे साहित्य आले आहे का, हे ढुंढाळायची सवय लागली. एकदा कीर्तनातून गणेशकथा मांडण्याची संधी माझ्यासमोर आली. त्यामुळे पंडित सातवळेकर यांचा गणेशकोश मी विकत घेतला. किंबहुना मी विकत घेतलेले ते पहिले पुस्तक असावे. िहदी भाषेतील ओशो रजनीश वाड्.मय, भागवत, तुलसीदास, मीरा आणि संत कबीरांची पुस्तके वाचनात आली. इंग्रजी पुस्तकांकडे मी फारसा वळालो नाही, परंतु तोत्तोचान, नॉट विथ आऊट माय डॉटरसारख्या पुस्तकांचे अनुवाद मात्र मी वाचून काढले.

परदेशात कीर्तन करण्यासाठी जाण्याची अनेकदा संधी आली. तेथील लोक तर्कशुद्ध विचार करतात, असे अनुभव आले. सावतामाळींच्या कथेवरील कीर्तनानंतर एकाने मला प्रश्न विचारला. त्यावेळी मी केलेल्या वाचनातून काढलेल्या नोंदींचा त्यांचे उत्तर देताना खूप उपयोग झाला. पुस्तक वाचनाप्रमाणेच सध्या ऑडिओ आणि व्हिडिओ सीडींचा संग्रहदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे भिकारदास मारुती येथील माझ्या घराच्या जागेचे नूतनीकरण झाल्यानंतर नवोदित कीर्तनकारांना उपयुक्त अशी पुस्तके, संदर्भग्रंथ आणि सीडींचा संग्रह असलेले ग्रंथालय साकारणार आहे. यामध्ये अनेक विषयांवरील पुस्तके आणि सीडी ठेवण्यात येणार आहेत. बदलत्या काळानुसार अत्याधुनिक साधनांतून तरुणाईला वाचनाची गोडी लावण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.

शब्दांकन – वीरेंद्र विसाळ