राष्ट्रीय नाटय़ विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) हे केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित राहू नये. विद्यालय प्रत्येक राज्यामध्ये असणे गरजेचे आहे. हे विद्यालय नाटय़कर्मी, प्रेक्षक आणि अभ्यासकांशी जोडले जाईल तेव्हाच ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होईल, अशी भूमिका ‘एनएसडी’चे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी मांडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र आणि राष्ट्रीय नाटय़ विद्यालय यांच्यातर्फे आयोजित नाटय़ अभ्यासवर्गाचे उद्घाटन वामन केंद्रे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, मकरंद साठे, ज्येष्ठ समीक्षक शमिक बंदोपाध्याय आणि ललित कला केंद्राच्या संचालिका डॉ. शुभांगी बहुलीकर या वेळी उपस्थित होत्या. मकरंद साठे यांनी लिहिलेल्या ‘सोशल अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ मराठी थिएटर सिन्स १८४३’ या पुस्तकाचे प्रकाशन बंदोपाध्याय यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर दिल्लीच्या जन नाटय़ मंच संस्थेचे दिग्दर्शक सुधन्वा देशपांडे यांचे ‘थिएटर ऑफ कमिटमेंट’ या विषयावर व्याख्यान झाले.
नाटक करणाऱ्या रंगकर्मीनी आपण ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. अभ्यास आणि कष्ट केल्यास एनएसडीचा संचालक होणे कठीण नाही, असेही वामन केंद्रे यांनी सांगितले.
शमिक बंदोपाध्याय म्हणाले,की नाटक हे केवळ सादरीकरण नसते. तर, त्यातून संस्कृती, समाज, भाषा आणि आठवणींचा पट उभा राहतो. त्यामुळे अनुवाद करताना त्याची अस्सलता टिकविणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने साठे यांचे हे पुस्तक म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
मकरंद साठे म्हणाले,की महाराष्ट्रामध्ये प्रचंड विचारधन आहे. मात्र, ते महाराष्ट्राबाहेर जाऊ शकलेले नाही. मराठी नाटकाचा गेल्या १७५ वर्षांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न मी या लेखनाद्वारे केला आहे. नाटक हे राजकारण आणि समाजाचा अर्थ लावण्याचे काम करीत असते.