राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अभियानात विद्यापीठाकडून बदल

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या गाव दत्तक  योजनेत या वर्षी बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार एका महाविद्यालयाने एक गाव दत्तक घेण्याऐवजी तीन महाविद्यालयांनी एकत्र येऊन परिसरातील गाव दत्तक घ्यावे आणि त्याबाबत राष्ट्रीय सेवा योजना विभागाला कळवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. अशा पद्धतीने पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्य़ांतील १५० गावे दत्तक घेऊन गावात काम करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने या बाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर जारी केले आहे. विद्यापीठाकडून समर्थ भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम केले जाणार आहेत. दत्तक योजनेसाठी तीन महाविद्यालयांनी गाव दत्तक घेण्याचे कळवल्यानंतर जिल्हानिहाय कार्यक्रम अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. या बैठकीत शिबिराची कार्यक्रम पत्रिका, कामाचा तपशील, विविध उपक्रम, कार्यक्रमांचा आराखडा, सर्वेक्षणाचे स्वरूप या बाबतची माहिती दिली जाईल. त्यानंतर डिसेंबर  आणि जानेवारीमध्ये गावांमध्ये प्रत्यक्ष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

संरचनात्मक विकास अपेक्षित

दत्तक गावासाठी निवड करताना तीन महाविद्यालयांचे विद्यार्थी सामावू शकतील, खाण्या-निवासाच्या सोयी पलीकडे गावात पुढील तीन ते पाच वर्षांमधील संरचनात्मक विकास, विविध कामे होणे अपेक्षित आहे, याचा आढावा घेऊन गावाची निवड करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.