23 October 2019

News Flash

नाटय़संमेलन बेळगावात, स्टार कलाकार पुण्यात!

भावी वाटचालीसाठी विचारमंथन घडावे या उद्देशातून यंदाचे शनिवारपासून (७ फेब्रुवारी) दोन दिवस नाटय़संमेलन बेळगावमध्ये होत असताना नेमके हेच दोन दिवस रंगभूमीवरील ‘स्टार’ कलाकार पुण्यामध्ये प्रयोग

| February 6, 2015 03:20 am

नाटय़ व्यवसायापुढील आव्हानांचा वेध घेत भावी वाटचालीसाठी विचारमंथन घडावे या उद्देशातून यंदाचे शनिवारपासून (७ फेब्रुवारी) दोन दिवस नाटय़संमेलन बेळगावमध्ये होत असताना नेमके हेच दोन दिवस रंगभूमीवरील ‘स्टार’ कलाकार पुण्यामध्ये प्रयोग करण्यात आनंद मानणार आहेत. डॉ. गिरीश ओक आणि भरत जाधव या नाटय़ परिषदेच्या माजी नियामक मंडळ सदस्यांसह संजय नार्वेकर आणि शरद पोंक्षे या बिनीच्या कलाकारांनी नाटय़संमेलनाकडे पाठ फिरविली असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
अनंत अडचणींचा डोंगर पार करून संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री फैय्याज यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे नाटय़संमेलन बेळगाव येथे होत आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानाने त्याची नांदी झाली. पुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठबळानंतर हे संमेलन बेळगावलाच घेण्याचे निश्चित झाले. मात्र, निधी संकलनाचा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे विशेष बाब म्हणून राज्य सरकारने या संमेलनासाठी अनुदानाच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तरीही उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी संयोजक असलेल्या नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेला कर्ज घ्यावे लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये हे संमेलन पार पडत असताना स्टार कलाकार मात्र, पुण्या-मुंबईमध्ये नाटय़प्रयोग करण्यामध्ये मश्गुल असणार आहेत. सर्व कलाकारांनी नाटय़संमेलनाला उपस्थित राहावे यासाठी दरवर्षी नाटय़ परिषदेला संमेलनाच्या दोन दिवसांमध्ये नाटय़प्रयोग करू नयेत, असे आवाहन करणारे पत्र सर्व शाखांना पाठवावे लागते. मात्र, तरीही नेमके हेच दोन दिवस महत्त्वाचे कलाकार पुण्यामध्ये असल्याने या कलाकारांनी नाटय़ परिषदेच्या फतव्यालाच हरताळ फासला असल्याचे उघड झाले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी (६ फेब्रुवारी) डॉ. गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कहानीमें ट्विस्ट है’ या नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग होत आहे. तर, नाटय़संमेलनाचे उद्घाटन आहे त्या शनिवारी (७ फेब्रुवारी) रात्री साडेनऊ वाजता भरत जाधव यांची भूमिका असलेल्या ‘ढॅण्टढॅण्ड’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. भरत जाधव हेच या नाटकाचे निर्माते आहेत. त्याचदिवशी अण्णा भाऊ साठे नाटय़गृह येथे रात्री साडेनऊ वाजता मंगेश कदम, लीना भागवत आणि शशांक केतकर यांच्या भूमिका असलेला ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.
शरद पोंक्षे यांची भूमिका असलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे बालगंधर्व रंगमंदिर आणि भरत नाटय़ मंदिर येथे दोन प्रयोग रविवारी (८ फेब्रुवारी) होत आहेत. तर, संजय नार्वेकर आणि भाऊ कदम यांच्या अभिनयाची ‘रानभूल’ बालगंधर्व रंगमंदिरातील प्रेक्षकांना पडणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता ‘शोभायात्रा’ नाटकाचा प्रयोग होणार आहे.
बेळगाव येथील हे नाटय़संमेलन यापूर्वी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असे दोन दिवस होणार होते, मात्र संयोजकांना पुरेसा अवधी मिळावा यासाठी संमेलनाच्या तारखा आठवडाभराने पुढे ढकलल्या गेल्या, याकडे ‘मनोरंजन’चे मोहन कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. मात्र, पुण्यातील नाटय़संस्थांसाठी चार महिन्यांपूर्वी तारखांचे वाटप झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध झालेल्या तारखेला नाटय़प्रयोगाची संधी दवडणे योग्य ठरले नसते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
 मुंबईतही नाटकांचा पाऊस
नाटय़संमेलनाच्या कालावधीतच शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबईमध्ये तर चक्क नाटकांचा पाऊसच पडणार आहे. चिन्मयी सुमीत आणि सतीश पुळेकर यांची भूमिका असलेले ‘चल थोडं एन्जॉय करू’, अश्विनी एकबोटे, शरद पोंक्षे यांच्या भूमिका असलेले ‘त्या तिघांची गोष्ट’, चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांचे ‘समुद्र’, राजन भिसे आणि इला भाटे यांचे ‘देहभान’, चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांच्या भूमिका असलेले ‘मिस्टर अँड मिसेस’ आणि ‘रानभूल’ या नाटकांचे प्रयोग होत आहेत. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख असलेले प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती असलेले ‘भगवा’ याच्यासह निवेदिता सराफ, वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका असलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.

First Published on February 6, 2015 3:20 am

Web Title: natya parishad actor drama belgaum