कणकवली येथील नाटय़संमेलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा करून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेला ‘ऊर्जा’ दिली खरी. पण, गेल्या चार वर्षांपासून हे अनुदान केव्हा पदरात पडणार याचीच नाटय़ परिषदेला प्रतीक्षा आहे.
चार वर्षांपूर्वी कणकवली येथील नाटय़संमेलनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे राम जाधव अध्यक्ष होते. तर, मोहन जोशी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष होते. उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार यांनी नाटय़ परिषदेला चार कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. या घटनेला बरोबर चार वर्षे उलटली असून मधल्या काळात नाटय़ परिषदेच्या धुरिणांमध्येही नाटय़ रंगले आणि पुन्हा एकदा मोहन जोशी यांच्याकडेच नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली. मात्र, नाटय़ परिषदेला हे अनुदान मिळालेले नाही.
मोहन जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष हेमंत टकले हे नाटय़ परिषदेचे अध्यक्ष झाले. अजित पवार यांच्याकडेच असलेला अर्थमंत्रिपदाचा कार्यभार आणि टकले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खजिनदार यामुळे तरी सरकारकडून हे अनुदान लवकर प्राप्त होईल अशी अपेक्षादेखील पूर्ण होऊ शकली नाही. सरकारच्या निकषानुसार या अनुदानाचा विनियोग कसा करणार याचा आराखडा नाटय़ परिषदेने राज्य सरकारला सादर केला होता. मात्र, बारामती येथील नाटय़संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित पवार यांनी नाटय़ परिषदच अनुदानासंदर्भात उदासीन आहे याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हा आराखडा सादर झाला असून अनुदानाची रक्कम मिळण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.