संगीत रंगभूमी हे मराठीला लाभलेले लेणे सदैव लखलखते रहावे यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने पुढाकार घेतला आहे. संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करून नव्या पिढीचे कलाकार लाभावेत, या उद्देशाने २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पुण्यामध्ये नाटय़संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री फैय्याज या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी संगीत रंगभूमीवर नव्या पिढीचे कलावंत घडविण्याचा मानस बोलून दाखविला होता. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून नाटय़संगीत प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी नाटय़ परिषदेला दिला. त्यानुसार घेण्यात येत असलेल्या या शिबिरास खुद्द फैय्याज मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी दिली. राज्यामध्ये जेथे संगीत नाटके होतात त्या सर्व ठिकाणी अशा स्वरूपाची शिबिरे घेण्याचा नाटय़ परिषदेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक येथे होणाऱ्या तीन दिवसांच्या नाटय़संगीत प्रशिक्षण शिबिरामध्ये रामदास कामत, कीर्ती शिलेदार, मधुवंती दांडेकर, शैला दातार, रवींद्र खरे, सुचेता अवचट, चारुदत्त आफळे आणि ऑर्गनवादक गंगाधर देव हे मुख्य प्रशिक्षक असतील. यामध्ये नांदीगायन, लक्षणगीत आणि पारंपरिक वृत्तांच्या चालीची गीते, संगीत नाटकांचा इतिहास, त्यातील गद्य पदांचे अर्थ, नाटकातील त्या पदांचे स्थान, पारंपरिक नाटय़पदांचे शिक्षण, उपशास्त्रीय संगीतावर आधारित पदे, संगीत नाटकातील भैरवी आणि भरतवाक्य, नवीन संगीतकारांनी केलेल्या रचना याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सुनील महाजन आणि भाऊसाहेब भोईर या शिबिराचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या शिबिरामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या कलाकारांची २० ऑगस्ट रोजी स्वरचाचणी घेतल्यानंतर ३० जणांना या शिबिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दीपक रेगे (मो. क्र. ९४२३०१२००२) किंवा रवींद्र खरे (मो. क्र. ९४२२३१०६३९) यांच्याशी संपर्क साधावा. हे शिबिर संपल्यानंतर या कलाकारांनी एकत्रित येऊन एखादे संगीत नाटक बसवावे अशी संकल्पना आहे. या नाटकाचे विविध शाखांमध्ये प्रयोग व्हावेत. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास नाटय़संमेलनामध्ये प्रयोग करण्याची संधी देण्यासंबंधीचाही विचार करता येईल, असेही जोशी यांनी सांगितले.