पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबईमधील सर्जनविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हुंडा तसंच पुन्हा लग्न करण्याच्या हेतूने पतीने आपल्यावर हल्ला केल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. ४ मार्चला मुळशी येथे ही घटना घडली. महिला सध्या गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी डॉक्टर दिनकर मस्के सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. पुणे मिररने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डॉक्टर असणाऱ्या दांपत्याचं २०१६ मध्ये लग्न झालं होतं. पण त्यांच्यात सर्व काही ठीक नव्हतं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, पतीला आपल्यापासून घटस्फोट घेत दुसरं लग्न करायचं होतं. यासाठी त्याने नवी मुंबईतील घर सोडण्यास सांगितलं तसंच घटस्फोट देण्याची तयारी असून पतीच्या दुसऱ्या लग्नाला विरोध नसल्याचं लेखी संमतीपत्र मागितलं होतं. पण भांडणानंतर महिलेने संमतीपत्र न देताच घर सोडलं आणि पुण्यात आपल्या आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली.

पत्नी संमती देत नसल्याने मस्केने पुणे गाठलं. माहेरी इमारतीबाहेर पत्नीला कारमध्ये पाहिल्यानंतर मस्केने दगडाने हल्ला केला. कारमध्ये पत्नीची बहिण आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “दगड लागल्याने कारची काच फुटली पण महिलेला काही जखम झाली नव्हती. यामुळे चिडलेल्या मस्केने तुटलेल्या खिडकीतून आत जात पत्नीचं डोकं दरवाजावर आपटलं, ज्यामध्ये ती जखमी झाली. यावेळी महिलेच्या बहिणीने कारच्या बाहेर धाव घेतली आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. सगळा प्रकार पाहून तिथे गर्दीदेखील जमा झाली होती, ज्यांनी महिलेची सुटका केली”.

स्थानिकांनी महिलेला रुग्णलयात दाखल केलं. महिलेने याआधीदेखील पतीविरोधात हुंड्याची मागणी तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. आरोपी मस्के सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.