५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्ड लसकुप्या प्राप्त

नवी मुंबई : लस उपलब्ध नसल्याने गेले पाच दिवस पहिल्या मात्रेसाठी नवी मुंबईत लसीकरण बंद होते. ते बुधवारी काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर दुपारनंतर सुरू झाले. मात्र ऐन वेळी लस आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या २८ केंद्रांवर लस दिली जात होती.

नवी मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र ते फक्त एकाच केंद्रावर सुरू असल्याने अनेकांची निराशा झाली आहे. दिवसभरात अनेकदा प्रयत्न करूनही लसीकरणाची तारीख व वेळ मिळत नसल्याने नवी मुंबईकर त्रस्त आहेत.

त्यात शहरात लशींचा तुटवडा असल्याने मागील चार दिवस लशींचा पहिला डोस देणे बंद होते. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालयात कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा दिली जात होती. पहिल्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत होते.

बुधवारी महापालिकेला ५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्डच्या लसकुप्या प्राप्त झाल्याने बुधवारी दुपारी १ नंतर लसीकरण सुरू झाले होते; परंतु वाशी येथील कामगार विमा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र मिळालेला लससाठाही कमी असल्याने लसीकरण किती दिवस सुरू राहील हे पालिका प्रशासनालाही सांगता येत नाही. लसीकरणाचे दैनंदिन चित्र बदलत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आहे.

जिल्ह्य़ातील नवीन लशींचा साठा

शहर                   कोविशिल्ड      कोव्हॅक्सिन      एकूण

ठाणे                      ७५००         ७०००              १४,५००

कल्याण-डोंबिवली   ५९००         ६०००             ११,९००

नवी मुंबई               ९०००         ५०००             १४,०००

मीरा-भाईंदर            ७०००         ३०००         १०,०००

भिवंडी                   १०००          २५००          ३५००

उल्हासनगर            १५००          १५००         ३०००

ठाणे ग्रामीण            ६५००         ७०००         १३,५००

एकूण                    ३८,४००       ३२,०००       ७०,४००

तरुणांमध्ये नाराजीचा सूर

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येते. मात्र केंद्र कमी असल्यामुळे पूर्वनोंदणी काही वेळातच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येते. त्यामुळे लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.