पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिंद्धू यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबाबत ‘एका व्यक्तीच्या कृत्याला संपूर्ण देश जबाबदार कसा?’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे अशी मागणी होत असतानाच सिद्धू यांनी मात्र पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं वक्तव्य केले. मूठभर लोकांमुळे तुम्ही संपूर्ण देशाला (पाकिस्तान) जबाबदार धरता कामा नये तर हा प्रश्न चर्चेने कायमस्वरूपी निकाली लागू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. देशभरातून त्यांच्या या विधानाचा जोरदार निषेध करण्यात आला. मात्र स्वामी अग्निवेश यांनी या वक्तव्याचे समर्थन केले. संपुर्ण देशाला जबाबदार धरण्यापेक्षा हा हल्ला करण्यामागे जी शक्ती आहे त्याचे समूळ उच्चाटन करण्याची गरज असल्याचे मत अग्निवेश यांनी व्यकत केले. मतदार जागृती परिषद आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावरील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते, तर स्वामी अग्निवेश, तीस्ता सेटलवाड, गिरीधर पाटील, निरंजन टकले यावेळी उपस्थित होते. स्वामी अग्निवेश पुढे म्हणाले, पुलवामा येथील जवानांवरील हल्ल्याबाबत राज्यपालांनी चूक मान्य केली आहे. मात्र ३०० किलो स्फोटके कुठून आली, एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानादेखील अशी घटना कशी घडली असे प्रश्न स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केले. यावेळी अग्निवेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले, या संघर्षाला धार्मिक रंग देता कामा नये. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांना घेऊन सिक्युरिटी काऊन्सिलची स्थापना करुन आपत्तींचा एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे. तर मॉब लिंचिंग हा दहशतवाद नाही का, गोहत्या विरोधात हिंसा करणाऱ्यांना मोकळे सोडले जाते, दलित आणि आदिवासींना माओवादी ठरवून तुरूंगात डांबले जाते या सर्व घटना लक्षात घेता हा दहशतवाद नाही का? अशा घटना घडवणार्‍या वर आजपर्यंत कारवाई का झाली नाही. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. न्यायमूर्तीना मारल्याचे आरोप असलेले लोक सत्ताधारी पक्षात असतील, तर दहशतवादाविरुध्द लढाई कशी लढली जाईल असा परखड सवाल त्यांनी सरकारला विचारला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu controversial statement on pulwama terror attack swami agnivesh reacted on same
First published on: 17-02-2019 at 17:31 IST