प्रसिद्ध वन्यजीव प्रकाशचित्रकार विश्वनाथ भागवत, रिया भागवत यांचे पक्षी निरीक्षण

पुणे : लाजाळू अशा नवरंग या देखण्या पक्ष्याचे चिंचवडमध्ये प्रथमच दर्शन झाले आहे. प्रसिद्ध वन्यजीव प्रकाशचित्रकार विश्वनाथ भागवत आणि रिया भागवत यांना पक्षी निरीक्षण करताना नुकताच हा पक्षी दिसला. नर आणि मादी दोघेही दिसायला सारखेच असलेल्या या पक्ष्याला इंग्रजीमधे ‘इंडियन पिट्टा’ तर मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये नवरंग म्हटले जाते.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
art
कलाकारण: इथं नव्हतं आरक्षण; तरी दिसलेच गुण!
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

विश्वनाथ भागवत म्हणाले, हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंडय़ा शेपटीचा आहे. याचे डोके फिकट पिवळसर रंगाचे असते आणि त्याच रंगाचे पोट असते. याच्या काळ्या जाड चोचीपासून मागे डोळ्यावर अगदी मानेपर्यंत काळी गडद पट्टी असते. नवरंग पक्ष्याचे पंख गडद हिरवे असून त्यावर एक आकाशी निळा ठिपका दिसतो. उडताना या हिरव्या, निळ्या रंगाच्या आणखी छटा दिसतात. गळ्याखाली पांढरा रंग असतो, तर शेपटीखाली पोटाच्या शेवटी गडद लाल रंग दिसतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात. एवढा रंगीबेरंगी पक्षी असल्यामुळेच त्याला नवरंग असे अनुरूप नाव मिळाले आहे. या ठळक वैशिष्टय़ांमुळेच हा पक्षी सहज ओळखता आला.  हा सहसा जंगलामधे पालापाचोळ्याखाली दडलेल्या अळ्या, मुंग्या इतर कीटक टिपतो. त्याच्या जाडसर चोचीने तो पानांची बरीच उलथापालथ करताना दिसतो. यासाठी त्याच्या दणकट पायांचा उपयोग करून घेतो. या पायांमुळेच त्याला जमिनीवर उडय़ा मारत चालता येते.

पक्षी निरीक्षकांनी नोंदी पाठवाव्यात

पक्षी अभ्यासक आणि अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला म्हणाले, संस्थेतर्फे २००७ पासून पिंपरी-चिंचवड परिसरातील पक्षी वैविध्याचे दस्तावेजीकरण केले जात आहे. अद्याप पिंपरी-चिंचवड परिसरात कोठेही नवरंग पक्षी दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पक्षी वैविध्यात आता या देखण्या पक्ष्याची भर पडली आहे. नवरंग हा स्थानिक पक्षी असून भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो. मूळ दक्षिण भारताचा रहिवासी असून उत्तरेकडे प्रजननासाठी आश्रयास येतो. त्याच्या विणीच्या काळात म्हणजे, मे ते ऑगस्ट या काळात तो उत्तर आणि मध्य भारतात स्थानिक स्थलांतर करतो. महाराष्ट्रात विदर्भ आणि सह्य़ाद्रीच्या काही भागात दिसतो. ऑक्टोबपर्यंत यांची पिले मोठी होऊन उडण्यास सक्षम होतात. त्यामुळे आपला विणीचा काळ पूर्ण झाल्यामुळे हा दक्षिणेकडे मूळस्थानी परतीच्या वाटेवर असावा.

नवरंगच्या प्रवास मार्गावर अजून अभ्यास करणे गरजेचे आहे. पक्षी निरीक्षकांनी पिंपरी-चिंचवड परिसरात अन्य ठिकाणी ‘नवरंग’ पक्षी दिसल्याच्या नोंदी सांगितल्यास या अभ्यासास मदत होईल. आपल्या नोंदी या omshreeuv@gmail.com  मेलवर पाठवाव्यात.