फुलांची मोठय़ा प्रमाणावर आवक; झेंडूलाही मागणी

नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर हार तसेच पूजेसाठी शेवंतीच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून एरवी बाजारात प्रतिकिलो ३० ते ४० रुपये भाव असणाऱ्या शेवंतीला उच्चांकी भाव मिळाले आहेत. प्रतवारीनुसार शेवंतीला १५० ते १७० रुपये असा भाव मिळाला तर किरकोळ बाजारात शेवंतीच्या फुलांची विक्री २०० रुपये प्रतिकिलो दराने सुरू आहे.

नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहे. झेंडू, शेवंती, गुलाब  तसेच अन्य  फुलांची मोठी आवक होत आहे. दसरा येत्या मंगळवारी (८ ऑक्टोबर) असून दसऱ्यासाठी खास झेंडूच्या फुलांची आवक सुरू झाली आहे, अशी माहिती फूलबाजारातील प्रमुख व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

झेंडूची आवक चांगली होत असली तरी अद्याप अपेक्षेएवढे भाव मिळालेले नाहीत. नवरात्रोत्सवापूर्वी पुणे तसेच लगतच्या जिल्ह्य़ांमध्ये झालेल्या पावसामुळे फुले भिजली आहेत. कोरडय़ा फुलांना चांगली मागणी आहे.

अन्य फुलांच्या तुलनेत शेवंतीला चांगले भाव मिळाले आहेत. शेवंतीच्या फुलांची आवक पुणे जिल्ह्य़ातील यवत, सोरतापवाडी, पुरंदर तालुक्यातील माळशिरस भाग, बारामती तसेच अहमदनगर, सातारा, वाई भागातून सध्या बाजारात होत आहे. शेवंतीची सर्वाधिक आवक पुणे जिल्ह्य़ातून होत आहे.

ओल्या फुलांची आवक

सोलापूर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्य़ातील यवत भागात झालेल्या पावसामुळे फुले भिजली आहेत. त्यामुळे प्रतवारीवर परिणाम झाला. शुक्रवारी बाजारात ओल्या फुलांची आवक झाली.  साध्या झेंडूचा वापर तोरणांसाठी केला जातो. कोलकात्ता झेंडू आकाराने लहान असून त्याचा वापर पूजेसाठी केला जातो. पुणे, सोलापूर, सातारा भागातून पुढील तीन दिवसांत झेंडूची आवक वाढेल, असे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

शेवंतीचा भाव प्रतिकिलोचा भाव

  • घाऊक बाजार
  •  व्हाईट शेवंती- १७० रुपये
  •   भाग्यश्री शेवंती-६० रुपये
  •   पेपर व्हाईट- ८० ते १५० रुपये
  • साधा झेंडू- २० ते ४० रुपये
  •  कोलकाता झेंडू-४० ते ५० रुपये

किरकोळ बाजार

शेवंती- २०० रुपये किलो