चार हजार पोलिसांचा ताफा तैनात; मंदिर परिसरातील गर्दीवर सीसीटीव्हींची नजर

शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी होत आहे.  शहरातील देवींची मंदिरे आणि उत्सवाच्या कालावधीत शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवानंतर पोलिसांकडून नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्ताची आखणी करण्यास सुरुवात करण्यात आली. शहरातील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतु:शृंगी मंदिर, श्री भवानी माता मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरासह अनेक मंदिरांत उत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी होते. संभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून नवरात्रात शहर आणि परिसरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रमुख मंदिरांचे विश्वस्त तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजयकुमार बावीस्कर यांनी दिली.

राज्य शासनाकडून शहराच्या वेगवेगळय़ा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या बरोबरच विविध मंदिरांचे विश्वस्त आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव आणि मुस्लीमधर्मीयांचा मोहरम सण एकत्र असल्याने पोलिसांकडून शहराच्या वेगवेगळय़ा भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. मंदिरांच्या परिसरात महिलांची मोठय़ा संख्येने गर्दी होते. गर्दीत फिरणारे चोरटे महिलांचे दागिने तसेच पर्समधील चीजवस्तू लांबवतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत, असेही बावीस्कर यांनी सांगितले.

मंदिराच्या परिसरात बेवारस वस्तू किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष (दूरध्वनी १००) येथे संपर्क साधावा. मंदिरांच्या परिसरात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे भाविक तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त बावीस्कर यांनी केले.

अष्टमी, नवमीला १२ पर्यंत ध्वनिवर्धकास मान्यता

नवरात्रोत्सवात मंडळे तसेच गरबा आयोजन करणाऱ्यांकडून ध्वनिवर्धकासंदर्भात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. उत्सवाच्या कालावधीत अष्टमी (२८ सप्टेंबर) आणि नवमी (२९ सप्टेंबर) या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहारातील काही लॉन्स आणि मैदानांवर गरब्याचे आयोजन करण्यात येते. गरब्याचे आयोजन करणाऱ्यांनी पोलिसांकडून परवानगी मिळवणे गरजेचे आहे. गरब्याच्या ठिकाणी होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी संयोजकांनी काळजी घ्यावी.

शहरभर पोलीस तैनात

  • नवरात्रोत्सवात शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
  • प्रमुख मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
  • बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
  • गर्दीत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचे पथक
  • राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा बंदोबस्तासाठी
  • मंदिरांच्या परिसरात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई