सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिषाने दोन लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी नौदलातील एका अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला दहा ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पार्वती राजीव चड्डा (वय ४६, रा. उदयबाग, घोरपडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी निशा प्रदीप भोजवानी (वय ३८, रा. कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चड्डा यांनी भोजवानी यांच्या मुलीस ‘सिम्बायोसिसमध्ये ओळख असल्याचे सांगून त्यांच्या नावाने प्रवेश मिळवून देण्यासाठी’ फोन केला. प्रवेश देण्यासाठी तिच्याकडून दोन लाख ३५ हजार रुपये घेतले. या प्रकरणी चड्डा यांना अटक करून त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील माधव पोळ यांनी केली. ती ग्राह्य़ धरून न्यायालयाने दहा ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.