दलित, आदिवासी आणि मागासवर्गासाठी नक्षलवादी लढत आहेत, भूमिगत राहून काम करत आहेत. नक्षलवाद्यांबाबत आम्हाला सहानुभूती आहे. ते आमचे मित्रच आहेत, असा दावा करत, त्यांचा मार्ग मात्र चुकीचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराबाबत जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भीमा कोरेगाव येथील हिंसाचार, नक्षलवाद, रिपब्लिकन ऐक्य अशा विविध मुद्दय़ांवर त्यांनी या वेळी भाष्य केले.

आठवले म्हणाले, ‘नक्षलवाद्यांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. समाजातील वंचित घटकांसाठी आपले घर-दार सोडून ते जंगलात राहतात. गरिबांना मदत करतात. परंतु, त्यांचा मार्ग चुकीचा असून आंबेडकरवादी विचारांशी तो कधीही जुळणारा नाही. त्यांनी आपला मार्ग सोडून लोकशाही स्वीकारून मुख्य प्रवाहात सामील व्हावे. तसे झाल्यास त्यांना आमच्या पक्षात घेऊ.’

भीमा कोरेगाव येथील घटनेबाबत ते म्हणाले,‘हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांकडे पुरावे आहेत. त्यामुळे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांना वाचविण्याचे कोणतेही काम केंद्र किंवा राज्य शासनाकडून होणार नाही. या दोघांनाही तातडीने अटक करावी. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबरोबर भिडे गुरूजींची छायाचित्रे आहेत, म्हणून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होत आहेत या आरोपाशी मी सहमत नाही. न्यायालयीन चौकशीत सत्य बाहेर येईल.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर जामीन मिळू नये म्हणून अद्याप अटक केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आरोपींना लवकरच अटक होईल. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गणपत गायकवाड यांच्या समाधीस्थळाच्या सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून प्रत्येकी पंचवीस लाख रूपये दिले जाणार आहेत.’

सत्ता काबीज करण्यासाठी सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्यामुळे जर समाजहित साधणार असेल, तर त्याला माझा पाठिंबा आहे. परंतु, माझे मंत्रिपद घालविण्यासाठी ऐक्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आणखी दहा वर्षे मी मंत्री राहणार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.