कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी नक्षलवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. छाप्यांदरम्यान त्यांच्याजवळ आढळून आलेली कागदपत्रे ही नक्षलवादाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला होता, या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली, असे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

एल्गार परिषदेचे प्रमुख आयोजक आणि सध्या अटकेत असलेले सुधीर ढवळे यांच्यासह इतर चार जणांचा नक्षलवाद्यांशी संबंध दिसून येत आहे. मात्र, या परिषदेत सहभागी असलेल्या सर्वच २५० संघटनांचा नक्षलवादाशी संबंध नाही. त्याचबरोबर या परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात यांचा सहभाग असल्याचा आमचा दावा नाही, मात्र त्यांच्या सहभागाबाबत तपास सुरु असल्याचेही पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस सहआयुक्त कदम म्हणाले, पुणे पोलिसांनी काल नागपुरातून वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन यांना अटक केली आहे. तर माओवाद्यांचा नेता रोना विल्सन याला दिल्लीतून अटक करण्यात आली. यातील कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंगला आज सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले त्यानंतर कोर्टाने त्याला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज दुपारी इतर अटक केलेल्या आरोपींना देखील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अटकेची कारवाई करण्यात आलेल्या शोमा सेन या एल्गार परिषदेला हजर होत्या. तसेच रोना विल्सनच्या घरातून पेन ड्राईव्ह, हार्डडिस्क आणि इतर काही कागपत्रे मिळाली असून ती न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्याचबरोबर रोना विल्सन आणि वकिल सुरेंद्र गडलिंग यांच्यामध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांचा इतर तीन जणांशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणी एकूण ५ जणांना काल (८ जून) अटक करण्यात आली.

विल्सनच्या कॉम्प्युटरमधून पोलिसांना एक पत्र मिळाले असून ते फरार नक्षलावादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने लिहीलेले आहे. या पत्रात काँग्रेसच्या काही नेत्यांचा आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. जानेवारी महिन्यांतील हे पत्र आहे.