संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खुनाच्या गुन्ह्य़ात आरोपींनी वापरलेली मोटार बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आली. त्या वेळी मोटारीचा क्रमांक बदलण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकाराची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन येरवडा पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर हे माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सरतपासणी घेत आहेत. गुरुवारी न्यायालयात गुन्ह्य़ात वापरेली मोटार, नयना पुजारी यांच्या बांगडय़ा, घडय़ाळ सादर करण्यात आले. चौधरीने हे सर्व साहित्य ओळखले. गुन्ह्य़ात वापरलेली मोटार ही आरोपी राऊत याच्या मोठय़ा भावाच्या मालकीची आहे. गुन्ह्य़ात जप्त केल्यानंतर त्याने न्यायालयाकडून ही मोटार साडेतीन लाख रुपयांच्या करारावर सोडवून घेतली होती. न्यायालयाने मोटार ताब्यात देताना मोटारीत कोणताही फेरफार करू नये, पुराव्याकामी गरज पडल्यास न्यायालयात हजर करावी या अटीवर दिली होती. मात्र, गुरुवारी न्यायालयात ही मोटार हजर केल्यानंतर तिचा क्रमांक बदलण्यात आलेल्या दिसून आले. या मोटारीचा त्या वेळी टुरिस्ट परवाना होता. आता खासगी वापरासाठीचा परवाना आहे. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांना चौकशी आदेश दिले. त्याच बरोबर कराराचा भंग केल्याप्रकरणी मोटारीच्या मालकाने १३ फेब्रुवारी न्यायालयात म्हणणे मांडावे असा आदेश दिला.