संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत आणि विश्वास कदम हे घटनास्थळी हजर होते. दोघा आरोपींचे मोबाईल लोकेशन (स्थळ) घटनास्थळाच्या परिरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते, अशी साक्ष या खटल्याचे मुख्य तपास अधिकारी आणि येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी शनिवारी ( २ एप्रिल) न्यायालयात दिली.
नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. सावंत यांची सरतपासणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी घेतली. या खटल्यात सावंत हे ३७ वे साक्षीदार आहेत. पुजारी खून खटल्यात अखेरची साक्ष नोंदविण्याचे काम सुरू असून बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी. ए. अलुर काम पाहात आहेत. १३ ऑक्टोबर २०१० रोजी नयना पुजारी खूनप्रकरणाचा तपास खेड पोलिसांनी येरवडा पोलिसांकडे सोपविला. त्यानंतर पुजारी खून खटल्यातील आरोपी राजेश चौधरी याचा कबुली जबाब दोन पंचांसमक्ष २८ ऑक्टोबर २०१० रोजी नोंदविण्यात आला होता.
घटनास्थळावर नयना पुजारी यांच्या पर्समध्ये एटीएम कार्ड सापडले होते. एटीएम कार्डचा पासवर्ड देण्यासाठी आरोपी योगेश राऊत आणि विश्वास कदम यांनी धमकाविले होते. त्यावेळी आरोपी चौधरी याने नयना यांना पेन दिला आणि पासवर्ड व्हिजिटिंग कार्डवर लिहिण्यास सांगितले होते. घाबरलेल्या नयना यांनी पासवर्ड लिहून दिला होता. त्यानंतर आरोपी चौधरी आणि महेश ठाकूर यांनी नयनाच्या एटीएम खात्यातून पैसे काढले होते. पासवर्ड लिहिलेले व्हिजिटिंग कार्ड चौधरी याच्या खेडमधील गोळेगाव येथील घरातून पंचांसमक्ष जप्त करण्यात आले होते. आरोपी राऊत, ठाकूर आणि चौधरी यांच्या हस्ताक्षराचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच आरोपी योगेश राऊत आणि विश्वास कदम यांच्या मोबाईलचे लोकेशन (स्थळ) घटनास्थळावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते, अशी साक्ष सरतपासणीत नोंदवून घेण्यात आली.