News Flash

नयना पुजारी हत्या प्रकरण: जाणून घ्या सात वर्षातील घटनाक्रम

या प्रकारामुळे जनतेमध्ये संतापाची लाट

प्रतिनिधिक छायाचित्र

संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २६) आपले काम संपवून त्या दिवशी रात्री घरी जाण्यासाठी खराडी बायपास येथे झेन्सॉर कंपनीजवळ उभ्या होत्या. इंडिका कॅब चालक योगेश अशोक राऊत (वय २९, घोलेगाव,आळंदी.ता.खेड) तेथून जात असताना पुजारी यांना सोडण्याच्या बहाण्याने तो त्याच्या मालकीच्या मोटारीतून पुजारी यांना निर्जन भागात घेऊन गेला. ३ मित्रांसह त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर ओढणीने गळा आवळून खून करुन ओळख पटू नये म्हणून त्यांचा चेहरा दगडाने ठेचला.

हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात ८ ऑक्टोबर रोजी दाखल झाला. या प्रकरणी योगेश अशोक राऊत (वय२४, रा. गोळेगाव, ता. खेड), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर ( वय २४, रा. सोळू, ता. खेड ), विश्वास हिंदुराव कदम (वय २६, रा. दिघीगांव, मूळ गाव ‍भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा ) या चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ आक्टोबर २००९ ला अटक केली.
या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. ससून रुग्णालयाच्या त्वचा रोग विभागात दाखल असताना मुख्य आरोपी योगेश राऊत नैसर्गिक विधीच्या बहाण्याने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. १७ सप्टेंबर २०११ रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार झाला. त्याबाबत त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांची नाचक्की झाली. राऊत याला पकडण्यासाठी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.

राऊत यास पकडण्याची जबाबदारी गृहखात्याने विशेष तपास पथकावर सोपविली. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी फरारी गुन्हेगारांना पकडण्यात वाकबगार असलेले पोलीस निरिक्षक सतीश गोवेकर यांची या पथकामध्ये नेमणूक केली. गोवेकर यांनी राऊत यास ओळखणा-या देवीदास भंडारे, संतोष जगताप, प्रदीप सुर्वे या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. या पथकाने राऊत याच्या गावातील मित्र, नातलग, विरोधक, बालपणीचे मित्र, आजवर केलेल्या नोकऱ्यांमधील सहकारी यांच्याशी संपर्क वाढवून राऊत याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
तपास पथकाची नजर राऊत याचा लहान भाऊ मनोज, आई सुनिता आणि पत्नी श्रावणी योगेश राऊत यांच्यावर होती. गुजरातमधील वापी, बडोदा, पोरबंदर, सोमनाथ, व्दारका, अहमदाबाद, राजस्थानमधील अजमेर, चितोडगड, जयपूर अशा ठिकाणी विशेष तपास पथकाने राऊत याचा अथक शोध घेतला. तो सूरतमधील बादलसिंग (मूळ बिहार) यास पळून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भेटल्याची माहिती पोलिसांना समजली.

या दरम्यान दिल्लीतही गँगरेपमुळे देशभर असंतोष पसरला. हेच कारण पुढे करुन नयना पुजारी हिचे पती अभिजीत पुजारी यांनी काही संघटनांसोबत पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण झोतात ठेऊन विशेष तपास पथकाबाबत नाराजी व्यक्त केली. अशा वेळी सतीश गोवेकर यांना राऊत पंजाब, दिल्ली येथे असल्याची माहिती समजली. या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी तपास पथक मे महिन्यात दिल्लीमध्ये दाखल झाले. १५ दिवसांमध्ये २० ते २५ जणांकडे चौकशी करुनही राऊत याच्या वास्तव्याचा पत्ता मिळत नव्हता. चिकाटीने तपास पथक काम करत असताना राऊत हा दिल्लीहून शिर्डीला रवाना झाल्याची माहिती समजली. पथकाने तत्काळ बायरोड शिर्डी गाठली. ज्या ठिकाणी राऊत येणार होता, तेथे सापळा रचला. शिर्डी बस ठाण्यात राऊत आलेला दिसल्यावर पथकातील संतोष जगताप यांनी त्यास ओळखले. राऊत याला पकडून बेड्या ठोकण्यात आल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 1:52 pm

Web Title: nayana pujari verdict gangrape murder case july 2009 alandi pune in marathi 2
Next Stories
1 Nayana Pujari case : नयना पुजारी खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी; उद्या शिक्षेची सुनावणी
2 पारदर्शक उदासिनता : गुडघा मोडला असतानाही रौप्यपदक विजेता खेळाडू सरकारी मदतीपासून वंचित
3 पुण्यात पावसाचा शिडकावा;बारामती, शिरूरमध्ये जोरदार पाऊस
Just Now!
X