‘विज्ञानाविषयीच्या उलट-सुलट चर्चापेक्षा खरे विज्ञान अधिक रंजक आहे. त्यामुळेच ‘नॉनसायन्स आणि नॉनसेन्स’ मधील फरक लक्षात घ्यायला हवा. विज्ञानातील रंजकता अभ्यासण्याची सवय लावून घ्या,’ असा संदेश रसायनशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना दिला.
पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेच्या (एनसीसीएस) पंचविसाव्या वर्धापनदिना निमित्त ‘सायन्स अ‍ॅण्ड नॉन-सायन्स’ या विषयावर डॉ. वेंकटरामन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वेंकटरामन यांनी उत्तरे दिली. मंगळ मोहिमेपूर्वी तिरूपतीची पूजा करणे, यानाची पूजा करणे या गोष्टींचा वेंकटरामन यांनी समाचार घेतला. भारतीय राजकारणी ज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतात. ही बाब सर्वसामान्य नागरिकांसाठी निश्चितच त्रासदायक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर न्यूमरॉलॉजी, ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान या विषयांवर त्यांनी संवाद साधला.
डॉ. वेंकटरामन यांनी सांगितले, ‘‘विज्ञानाची प्रगती ही विचार स्वातंत्र्यावर अवलंबून आहे. विचारांचे सार्वत्रिकीकरण, कारण आणि योगायोग यांतील फरक स्पष्ट करण्यात आलेले अपयश, पुरावे नसतानाही एखाद्या बाबीवर विश्वास ठेवण्याची मानसिकता या बाबींमुळे चुकीच्या समजुतींचा अधिक प्रसार होतो. तरुणांनी समाजातील ज्येष्ठांची मानसिकता बदलण्यासाठीचे प्रयत्न करण्यापेक्षा स्वतचे विचार वैज्ञानिक आधारावर विकसित करावेत. तर्कशुद्ध  गोष्टींवरच विश्वास ठेवण्याची सवय लावून घ्यावी. पाश्चिमात्य देशांमध्ये विज्ञानाला धरून असलेल्या विचारपद्धतींचा अवलंब समाजाने केल्यामुळे त्यांची प्रगती झाली. मात्र, भारतात अजूनही ही परिस्थिती दिसत नाही. अनेकदा वैज्ञानिकही चुकीच्या बाबींचा पाठपुरावा करतात. मात्र, विज्ञानच त्यांच्या चुका उघड करते हा इतिहास आहे.’’
विविध वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, ‘‘भारतीय आयुर्वेदाप्रमाणेच चीनमध्येही प्राचीन औषधोपचार पद्धती अस्तित्वात आहे. तेथील संशोधकांनी त्याला विज्ञानाच्या कसोट्यांवर तपासून पाहण्यास सुरुवात केली आहे. भारतातही आयुर्वेदाविषयी व्यापक संशोधन होण्याची गरज आहे. होमिओपॅथीमध्ये होणाऱ्या कोट्यवधींच्या आíथक उलाढालीमुळे आता स्वित्र्झलडसारख्या देशात होमिओपॅथीचं संशोधन सुरू असल्याचं प्रसारित केले जात आहे, हे पैलू लक्षात घ्यायला हवेत.’’ भारतीय विद्यापीठांमध्ये ‘ज्योतिषशास्त्र’ विषय म्हणून समावेश होणार आहे, हे ऐकले. ही बाब अत्यंत चुकीची असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.