दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत करण्याऐवजी जनतेची दिशाभूल करीत राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करीत आहे, असा आरोप पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी केला.
दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (१४ सप्टेंबर) जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पाश्र्वभूमीवर भाजपतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, राजेश पांडे आणि रमेश काळे या वेळी उपस्थित होते. राज्यावर सध्या आालेले संकट हे अस्मानी आहे. परंतु, गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारच्या राजवटीतील संकट हे सुलतानी होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादीने पुकारलेले जेलभरो आंदोलन हे गेल्या १५ वर्षांतील अपयश, नियोजनाचा अभाव आणि गमावलेला जनाधार झाकण्यासाठीच असल्याचा आरोप करून बापट म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळासाठी पाच-सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हे सर्व पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच दुष्काळी भागात स्वस्तामध्ये धान्य वितरण आणि विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासासारखी पावले उचचली आहेत. पाणीटंचाईच्या काळात बेकायदा पाणीउपसा केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्यांच्या नियोजनशून्यतेमुळे दुष्काळाचे संकट ओढवले त्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्काळासारख्या विषयावरून आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका अनिल शिरोळे यांनी केली.