News Flash

“कुणीतरी काहीतरी सांगावं आणि मी…”, चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्यावर अजित पवारांची कोपरखळी!

निवडणूक आयोगाने जाहीर केलं म्हणून निवडणुका झाल्या - अजित पवार!

राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना राज्य सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राज्य सरकार करत असलेल्या गोष्टींमध्ये दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर विरोधकांकडून देखील वेळोवेळी टीका केली जात आहे. त्यामुळे करोनासोबतच राजकीय कलगीतुरा देखील राज्यात वेळोवेळी पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये असाच राजकीय कलगीतुरा दिसू लागला आहे. नुकतीच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. अजित पवार यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावं किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याचं पत्रकारांनी सांगताच अजित पवार यांनी त्यावर त्यांच्या शैलीत प्रतिटोला हाणला आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं.

मी एका कानाने ऐकेन आणि…!

अजित पवार यांनी चंद्रकात पाटलांना खोचक शब्दांमध्ये कोपरखळी मारली. “तुम्ही सगळे मला ओळखता. मला कुणीतरी काहीतरी सांगावं आणि त्यांचं मी ऐकावं असं नाहीये. माझ्या नेत्याने सांगितलं तर मी ऐकेन. आमच्या महाविकासआघाडीने सांगितलं तर मी ऐकेन. कुणीतरी फारच विचारपूर्वक सल्ला दिला तर मी ऐकेन. पण सल्ला देताना त्याचा हेतू काही वेगळा असेल, तर कशाला मी ऐकेन? या कानाने ऐकेन आणि या कानाने सोडून देईन”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

इतर राज्यांतही प्रचार होतोच की!

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी पंढरपुरात निवडणुकांनंतर वाढलेल्या करोना रुग्णसंख्येवर देखील भूमिका मांडली. “निवडणूक आयोगाने निवडणूक लावल्यामुळे पंढरपुरात निवडणुका झाल्या. राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या, त्या आपण पुढे ढकलल्या. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडूमध्ये निवडणुका लागल्यानंतर सगळे तिकडे प्रचार करतच होते ना? कुंभमेळ्यामध्ये लोकं आंघोळी करत होते, दर्शन घेतच होते, स्नान करतच होते. याला नागरिकच जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या म्हणून त्यांना जबाबदार धरणार का?”, असं ते म्हणाले.

३५० कोटी रुपये पोत्यात भरुन अजितदादांच्या टेबलवर टेकवा आणि म्हणा… : चंद्रकांत पाटील

“पंढरपूरच्या माझ्या दौऱ्यात नियमावलीचं पालन करून सभा आयोजित करावी असं आम्ही सांगितलं होतं. आम्ही सगळ्यांना सांगतोय की मास्क लावा. पण काहीजण मास्क न लावता फक्त रुमाल बांधतात. काय करावं आता त्याला?” असा प्रतिप्रश्न देखील अजित पवार यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 7:22 pm

Web Title: ncp ajit pawar mocks bjp chandrakant patil pandharpur corona update pmw 88
Next Stories
1 क्रिकेटपटू हरभजन सिंगने पुण्यात सुरू केले ‘प्रशंसनीय’ कार्य
2 महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीबाबत निर्णय कधी होणार? अजित पवारांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!
3 पुणेकर उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरमधून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स; मोदी सरकार करणार ‘एअर लिफ्ट’
Just Now!
X