25 February 2021

News Flash

राजकीय पुनर्वसनासाठी विलास लांडे यांची धडपड

विलास लांडे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार

पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीतील शह-काटशहच्या राजकारणाला वेग

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार विलास लांडे यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा आमदार व्हायचे आहे. राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या माध्यमातून राजकीय ‘पुनर्वसन’ करावे, यासाठी लांडे यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना लांडे यांनी भोसरीत आणले, त्यानिमित्त झालेल्या प्रवासात लांडे यांनी पवारांजवळ ‘मन मोकळे’ केले. यानंतर, लांडे विरोधकांनी उचल घेतली असून राष्ट्रवादीतील शह-काटशहाने वेग घेतला आहे.

विलास लांडे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मात्र, राष्ट्रवादीचेच नगरसेवक व लांडे यांचे भाचेजावई महेश लांडगे यांच्याकडून ते पराभूत झाले. राष्ट्रवादीतील गटबाजीच्या राजकारणातून घडवून आणण्यात आलेला हा पराभव लांडे यांच्या खूपच जिव्हारी लागला होता. त्यामुळेच नंतर बराच काळ लांडे राजकारणापासून चार हात दूर होते. अलीकडेच ते राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले असून पालिका निवडणुकांसाठी त्यांनी शड्डू ठोकले आहेत. राजकीय वर्चस्वाचा भाग म्हणून आगामी विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा आमदार व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, खच्ची झालेल्या विलासरावांचे पुन्हा ‘बळ’ वाढवण्यास राष्ट्रवादीच्याच एका गटाचा तीव्र विरोध आहे. आमदार महेश लांडगे यांच्या दृष्टीने लांडे आमदार होणे बऱ्यापैकी अडचणीचे असल्याने त्यांचाही विरोधी सूर आहे. आतापर्यंत विधान परिषदेच्या आमदारकीचा विषय थंड होता. मात्र, बुधवारी लांडे यांच्या मध्यस्थीतून पवार कार्यक्रमासाठी भोसरीत आले. प्रवासात येताना पवारांच्या गाडीतच लांडे होते. या वेळी लांडे यांनी पवारांजवळ मनातील खदखद बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते.

शहरातील राष्ट्रवादीची परिस्थिती, महापालिकेचा कारभार, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी लांडे यांनी पवारांना सांगितल्या असाव्यात, असे त्यांचे समर्थक सांगतात. लांडे यांनी पुन्हा आमदार होण्यासाठी शड्डू ठोकल्यानंतर पक्षातील त्यांचे पारंपरिक विरोधकही सक्रिय झाले आहेत. त्यातून शह-काटशहाच्या राजकारणाने वेग घेतल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:31 am

Web Title: ncp and vilas lande fight
Next Stories
1 इंदापूरच्या पाण्यासाठी आंदोलन
2 खाऊखुशाल : ‘आप्पा’ची ‘खिका’
3 दुर्मीळ अक्षरठेवीतून ‘अर्थ’निष्पत्ती!
Just Now!
X